महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्याच्या सभेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे याच भावनेतून मनसे भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकसभेसाठी बिनशर्त पाठींबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांना राज यांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. अमित शहा भेटीवरुन झालेल्या चर्चा आणि अन्य विषयांवर राज यांनी भाषणामध्ये भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं थेट नाव घेत टीका केली.
2014 साली भाजपला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी 2019 मध्ये मोदींना थेट विरोध केला. यादरम्यान राज यांचं लाव रे तो व्हिडीओ हे कँपेनही चांगलंच गाजलं. या सर्व घडामोडींनंतर राज ठाकरे महायुतीच्या वळचणीला जाणार असल्याच्या चर्चांमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
भूमिका पटली नाही म्हणून मोदींना विरोध केला, मुख्यमंत्रीपदासाठी नाही -
याच चर्चांचा धागा पकडत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी एखाद्यावर प्रेम किंवा राग टोकाचा करतो. 2019 मध्ये नरेंद्र मोदींना मी केलेला विरोध हा त्यांची भूमिका न पटल्यामुळे केला होता. जिकडे चांगलं होतं तिकडे मी चांगलंच बोलतो आणि जिथे मला चुकीचं वाटतं तिकडेही मी थेट बोलून दाखवतो. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी मोदींवर टीका केली नाही. आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत तशी टीका मी कधीच केली नाही. तुमची सत्ता घालवली म्हणूनच आता तुम्ही अशी टीका करत आहात", असं म्हणत राज यांनी उद्धव आणि संजय राऊत यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.
अवश्य वाचा - लोकसभेसाठी मनसेची भूमिका ठरली! राज ठाकरेंनी केली घोषणा
यादरम्यान राज यांनी आपल्या जुन्या गुजरात भेटीचे संदर्भ देत, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारा मी पहिला नेता होता ही आठवणही करुन दिली. परंतु 2014 सालची भाजपची भूमिका आणि 2019 सालच्या भूमिकेत मला तफावत दिसली म्हणून मी मोदींवर टीका केल्याचं राज यांनी सांगितलं. परंतु याचवेळी कलम 370 सारख्या घटनांमध्ये त्यांचं अभिनंदन करणारा मीच पहिला होतो असंही राज ठाकरे म्हणाले.
राजकारणाच्या घसरलेल्या स्तरावर राज यांनी व्यक्त केली चिंता -
यापुढे बोलत असताना राज ठाकरे यांनी राज्यात सध्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर आपलं मत मांडलं. सध्याच्या राजकारणाची परिस्थिती ही कॅरम चुकीचा फुटला अशी झाली आहे...कोणता नेता कुठे आहे हे कळतच नाही, प्रत्येकाला विचारावं लागतं असं म्हणत राज यांनी आपली खंत व्यक्त केली. यावेळी राज यांनी मतदारांनाही या व्यभिचाराला पाठींबा देऊ नका असंही आवाहन केलं.
विधानसभेसाठी राज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार -
भाषणाच्या अखेरीस राज यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्यास सांगितलं. आगामी विधानसभेच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी मी लवकरच तुमच्या भेटीला येणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.