दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करत पर्यटकांना ठार केलं. त्यानंतर भारताने कडक पावलं उचलत, पाकिस्तानची कोंडी केली. पाकिस्तान बरोबरचा सिंधू जलकरार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारं पाणी रोखण्यात आलं. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. शिवाय पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश ही देण्यात आले. पाकिस्तानचे पाणी रोखणे हा मास्टर स्टोर असल्याचं बोललं गेलं. मात्र भारताने पाकिस्तानचं पाणी रोखलं हा दावा खोटा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला होता. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय झाला. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाच नाही. सरकार फक्त जनतेची दिशाभूल करत आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यताही आहे.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिनानिमित्त ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा मोठा आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भारत सरकारचे 24 एप्रिल 2025 चे पत्र माध्यमांसमोर दाखवत काही खळबळजनक आरोप केले आहे. भारत सरकारने पाकिस्तानचे वॉटर मिनिस्टर सय्यद अली यांना 24 एप्रिल रोजी पत्र दिलं आहे. मात्र त्या पत्रात कुठेही पाणी बंद करण्याचा उल्लेख नाही असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. फक्त करार स्थगित ठेवण्यात आला आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे ही दिशाभूल असल्याचं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रित येण्याच्या चर्चांवरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणे शक्य नाही. दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. प्रत्येक नेता स्वतःच्या राजकीय डावपेचांनुसार खेळत असतो. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. राजकारण कसं ही खेळून चालत नसल्याचं देखिल त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी भारतीय जनता पक्षावरही आंबेडकरांनी थेट टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं भाजप देशात दहशतवाद्यांचा अजेंडा राबवत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.