
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये असून त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान मोदींनी अनेक बैठका घेतल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी पीएमओमध्ये पोहोचले होते. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला खूप महत्त्व दिलं जात आहे. ही भेट नवीन सीबीआय प्रमुखांच्या निवडीबाबत असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये पहलगाम हल्ल्याबाबतही चर्चा झाली असेल असंही बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर डोवाल बाहेर पडले. त्यानंतर गृहसचिव गोविंद मोहन पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी पीएमओमध्ये पोहोचले. पीएमओमधील बैठकांचा धडाका पाहाता लवकरच काहीतरी मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी साउथ ब्लॉक येथील पंतप्रधान कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर बैठकांचा धडाका त्यांनी लावला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची पंतप्रधान मोदींची बैठक खूप महत्त्वाची मानली जात आहे.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधानांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबतही या प्रकरणावर बैठक घेतली आहे. सोमवारी झालेल्या या भेटीत संरक्षण सचिवांनी पंतप्रधानांना ताज्या परिस्थितीची आणि लष्करी तयारीची माहिती दिली, असं मानलं जात आहे. दरम्यान, सोमवारीच नवी दिल्लीत जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
यापूर्वी रविवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल एपी सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधानांना सद्यस्थिती आणि हवाई दलाच्या तयारीची माहिती दिली, असं मानलं जात आहे. ही भेट 40 मिनिटे चालली. तर शनिवारी नौदल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. दरम्यान, सोमवारी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत जपानी संरक्षण मंत्र्यांनी भारताला पाठिंबा दर्शवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world