
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांत अजूनही मन मिलाफ झाला आहे अशी स्थिती नाही. उलट एकमेकांवर कडी करण्याची संधी महायुतीतलेच स्थानिक नेते सोडत नसल्याची सध्या स्थिती आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा गड मानला जातो. पिंपरीमध्ये सध्या राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. मात्र त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमीका स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शिवाय राष्ट्रवादीचा प्रचार का करायचा असा प्रश्नच कार्यकर्त्यांनी नेत्यांना केला आहे. त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन नक्कीच वाढले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी विधानसभा मतदार संघात अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. इथल्या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत नेहमी झाली आहे. असं असताना यावेळी ज्यांच्या विरोधात काम केलं त्यांच्यासाठीच काम करावे लागेल यामुळे भाजप कार्यकर्ता अस्वस्थ आहे. नुकतीच पिंपरी विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील रागाला वाट करून दिली.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी रोखठोक मतं व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव पिंपरी चिंचवड शहर भाजपने केला आहे. लोकसभेत भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मिळाला नाही. आता आम्हाला पिंपरीत भाजपचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमीका भाजपच्या बैठकीत एकमुखाने मांडण्यात आलीय. शिवाय लोकसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटानं महायुतीचा प्रचार केला नाही. मग विधानसभेला आम्ही घड्याळाचा प्रचार का करायचा? असा प्रश्नच थेट नेत्यांना विचारला.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्त्या मेळावा झाला. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजी दिसू आली आहे. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येतोय. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे असे बैठकी नंतर स्पष्ट करण्यात आले. शिवाय पिंपरीची जागाही भाजपला मिळावी अशीही मागणी करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world