शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. साळवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सणसणीत राजकीय कानफाटात असल्याचे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. मातोश्रीवर पुढच्या काळात हम दो हमारे दो अशीच स्थिती दिसणार आहे असं ही कदम म्हणाले. ठाकरेंकडे येणाऱ्या काळात कुणी राहाणार नाही. अनेक जण शिंदे गटात येण्यासाठी लाईनमध्ये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजन साळवी यांनी महाराष्ट्राला एक प्रकारे दाखवून दिलं आहे. मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उद्धव ठाकरेंकडे काही राहीलं नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूपसलं. हे आता सर्वांना पटतं आहे असं कदम या पार्श्वभूमीवर म्हणाले. राजन साळवी यांनी आपल्याला फोन केला होता. त्यामुळे समाधान वाटवं. मी त्यांना चिंता करू नका, असं सांगितलं. वैभव नाईक पण माझ्या जवळचा आहे. कोकणातले सर्व आमदार आम्ही एकत्र होतो. पुढे आणखी चमत्कार दिसतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आता महाराष्ट्राच्या समोर येतोय, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कुणीही शिल्लक राहाणार नाही. सर्व जण शिंदेंकडे येत आहेत. पुष्कळ नावे आहेत जी पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकटेच त्यांच्या पक्षात राहातील. हे आधी ही आपण सांगितले होते. तसेच आता होत आहे असंही त्यांनी सांगितलं. साळवींचा प्रवेश म्हणजे ठाकरेंच्या सणसणीत कानफाटात आहे. अशा अनेक कानफाटीत त्यांना भविष्यात खाव्या लागणार आहेत असंही रामदास कदम म्हणाले. ये तो झांकी है, अभी बहोत कुछ बाकी है असं सुचक विधानही त्यांनी केला.
दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही कदम यांनी समाचार घेतला. शरद पवारांवर बोलण्याची संजय राऊत आणि विनायक राऊत यांची लायकी आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. पवारांचा संपुर्ण राज्याचाच काय देशाचा अभ्यास आहे. त्यांना ठाणे समजले नाही असं राऊत म्हणतात. ठाणे समजवून घ्यायचे असेल तर राजन विचारेंना विचारा असं सल्ला ते पवारांना देतात. जो माणून निवडून येवू शकत नाही तो काय पवारांना ठाणे समजवून सांगणार असा टोलाही कदमांनी लगावला. जे काल पर्यंत शरद पवार हे आमचे बाप आहेत असं म्हणणारे अचानक त्यांच्यावर सापा सारखे उलटले आहेत. असंही कदम म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार
एकनाथ शिंदेंना मिळालेल्या पुरस्कार हा त्यांचा गौरव आहे. पण त्यामुळे ही संजय राऊत यांचा जळफळाट झाला आहे. उद्धव ठाकरेंना तो पुरस्कार मिळाला असता तर त्यांना आनंद झाला असता. पण तेवढी कुवत आणि लायकी उद्धव ठाकरेंची आहे का असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला. ठाण्याचा खरा ठाणेदार हा एकनाथ शिंदे आहे हे त्यांना वारंवार दाखवून दिले आहे. संजय राऊत यांची अवस्था वाईट झाली आहे. ते आता गपचूप शरद पवारांची माफी ही मागतील. ते प्रसिद्धीसाठी नौटंकी करतात असंही कदम म्हणाले.