- मनोज सातवी, प्रतिनिधी
स्थानिक मराठी माणूस विरुद्ध उत्तर प्रदेश-बिहार सारख्या राज्यांतून येणारे परप्रांतीयांचे लोंढे हा विषय एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. शिवसेना, मनसे यासारख्या पक्षांनी सुरुवातीच्या काळात याच मुद्द्यावरुन राजकारण केलं. 2014 च्या निवडणुकीनंतर हा मुद्दा थंड पडलेला असताना आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी या वादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
वसई येथे एका कार्यक्रमात बोलत असताना अबू आझमी यांनी, आमच्या घामामुळे मुंबईला झळाळी मिळाली असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. वसईत विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे. त्याच्या चाचपणीकरता अबू आझमी आज वसईत बोलत होते.
आम्ही नसतो तर मुंबई ओसाड पडली असती - आझमी
आपल्या भाषणात बोलत असताना अबू आझमींनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या टिकेचं लक्ष्य केलं. "काही लोक आज आमच्या लोकांना टार्गेट करत आहेत, पण आम्ही नसतो ना तर मुंबई शहर मुंबई झालं नसतं. आम्ही नसतो तर मुंबई-महाराष्ट्र आता आहे तसा झाला नसता. आम्ही आलो नसतो तर मुंबई ओसाड पडली असती. आम्ही आमच्या घामाने मुंबईला नटवलं आहे.. आणि आम्ही तुला घाबरु? काही जणं खूप बोलतात. माझा एक यादव भाई उठला ना तर तुला उचलून आपटेल आणि बत्तीशी बाहेर येईल", अशा शब्दात अबू आझमी यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली.
याच कार्यक्रमात बोलत असताना अबू आझमी यांनी AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनाही लक्ष्य केलं. थेट नाव न घेता आझमी यांनी ओवैसी यांचा दलाल असा उल्लेख करत, पैसे घेऊन ते देखील फुट पाडण्याचं काम करत असल्याचं आझमी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात मनसेचं नेतृत्व या टीकेला काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world