एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा त्यामुळे मार्ग मोकळा झाला. त्यांनी कोणतीही ओढाताण किंवा दबावाचं राजकारण केलं नाही. त्यामुळे त्यांच्याच पक्षातले नेते एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खरा शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक असा करत आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक पत्र लिहीलं आहे. हे पत्र भावनिक असून एका लेकाने आपल्या बापासाठी लिहीलेलं हे पत्र आहे. त्यात त्यांनी आपल्या बाबांचा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे. या पत्रात श्रीकांत शिंदे यांनी काय म्हणलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. श्रीकांत शिंदे यांनी लिहिलेलं पत्र जसच्या तसं पुढील प्रमाणे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
ट्रेंडिंग बातमी - Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!
अशा आशयाचे पत्र श्रीकांत शिंदे यांनी लिहीले आहे. त्यांच्या या पत्रातून त्यांनी एकनाथ शिंदे हे सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री कसे होते याचा आवर्जुन उल्लेख केला आहे. शिवाय युती धर्माचे पालन त्यांनी कसे केले याचा ही उल्लेख केला आहे. शिवाय शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावाही युतीधर्मासाठी सोडल्याचे संकेतही यातून त्यांनी दिले आहेत. त्यांचे हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या पत्राची चर्चाही राजकीय वर्तूळात चांगलीच होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world