स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील तीनही घटक पक्षाच्या प्रमुखांनी वाद टाळण्याचे प्रयत्न केले मात्र त्याला तूर्तास तरी फार यश आल्याचे दिसत नाही. या घटक पक्षांनी विरोधकांऐवजी एकमेकांनाच शह देण्याचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येत आहे. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर, खासकरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यात शिंदेंचे नेते, पदाधिकारी फोडण्यास सुरूवात केली असून यामुळे एकनाथ शिंदे हे चिंतेत पडले आहेत. हे होत असतानाच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली असून ही मारहाण भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा: "पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा पश्चाताप होतोय", निष्ठावंत नेत्याला अश्रू अनावर
भाजप वि. एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील संघर्ष उफाळला
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख हरेश महाडीक, उपविभागप्रमुख महेश लहाने यांनी आपल्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गुरुवारी रात्री ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये या दोघांनी आरोप केला आहे की त्यांना भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केली आहे. शहरी भागातील गरिबांना सेवा अर्थात BSUP योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांसाठीची रजिस्ट्रेशन फी फक्त 100 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा जल्लोष करण्याचे शिंदेंच्या शिवसेनेने नियोजन केले होते. पाचपाखाडी विभागातील एका इमारतीमध्ये हा जल्लोष करण्यात येणार होता. याला भाजपच्या नारायण पवार यांनी विरोध केला होता. या विरोधातून पवार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा: 300 कोटींची मालकीण, नवऱ्याचं सेक्रेटरीसोबत अफेअर; मराठी महिला दक्षिण आफ्रिकेच्या घराघरात पोहोचली
अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली नाराजी
भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना आपल्या गळाला लावले होते. खास करून शिंदे यांची ताकद असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करून घेतले होते. यामुळे शिंदेंना मोठा दणका बसला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातले असून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला दुबळं बनविण्याचे प्रयत्न मुद्दाम चालवले आहेत का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.