देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार सुरु झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप पूर्ण झालंय. सर्व मंत्र्यांना त्यांचे दालन निश्चित केले जात आहेत. पण, मंत्रालयातील एक रुम घेण्यास कोणताही मंत्री तयीार नाही. या खोलीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या रुममध्ये बसणाऱ्या मंत्र्याचं पद जातं किंवा तो मृत्यू पावतो, असं मानलं जातं. ही खोली आहे रुम नंबर 602. मंत्रालयातील रुम नंबर 602 चं रहस्य काय आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप पूर्ण झालंय. त्यानंतर रुम नंबर 602 घेण्यास सर्व मंत्री घाबरत आहेत. त्यामागे मोठा इतिहास आहे. तो इतिहास समजून घेऊया
राज्यात 1999 साली काँग्रेस-एनसीपी सरकार आलं. त्यावेळी ही रुम छगन भुजबळ यांना देण्यात आली. पण, 2003 साली कोट्यावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प घोटाळ्यात त्यांचं नाव आलं. हा तेलगी घोटाळा म्हणूनही ओळखला जातो. या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
( नक्की वाचा : State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अजित पवारांना रुम नंबर 602 देण्यात आली होती. ही खोली मिळताच अजित पवार वादात अडकले. त्यांची तुरुंगवारी थोडक्यात टळली. त्यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
2014 साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं. त्यावेळी एकनाथ खडसे यांना 602 नंबर रुम देण्यात आली होती. पण, लवकरच खडसे जमीन घोटाळ्यात अडकले. त्यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर ही रुम पांडुरंग फुंडकर यांना मिळाली. त्यांनी दोन वर्ष काम केलं. पण, त्यानंतर त्यांचा ऱ्हदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
जून 2019 नंतर ही रुम कुणालाही देण्यात आली नव्हती. त्यापूर्वी 2019 साली कृषी विभाग भाजपा नेते अनिल बोंडे यांना देण्यात आला, त्यावेळी त्यांना ही रुम देण्यात आली. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर या रुममध्ये बसण्याची कोणत्याही मंत्र्यांची इच्छा नाही.
( नक्की वाचा : State Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदेचं वजन कायम, 2 महत्त्वाची खाती खेचण्यात यश )
कशी आहे रुम नंबर 602?
रुम नंबर 602 ही मंत्रालयातील मोठी खोली आहे. कायद्यानुसार ज्येष्ठ मंत्र्यालाच ही रुम मिळायला हवी. पण, वास्तविक ही रुम घेण्यास कुणीही तयार नाही.
आता कुणाला मिळाली रुम नंबर 602 ?
यंदा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना रुम नंबर 602 मिळाली आहे. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्याचबरोबर भाजपाचे आमदार आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे समर्थक आनंदी झाले होते. पण, त्यांना रुमनंबर 602 मिळाल्यानंतर त्यांच्यात काळजीचं वातावरण आहे.
खोटी ठरली अंधश्रद्धा
राज्य तसंच देशाच्या राजकारणात या पद्धतीच्या अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. पण, त्यापैकी काही अंधश्रद्धा आता मोडीत निघाल्या आहेत. महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री त्याचा कार्यकाळ पूर्ण करत नाही, ही अंधश्रद्धा होती. पण, 2014 साली मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत ही अंधश्रद्धा मोडली.
ज्या राजकीय नेत्यांच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये आर नाही तो नेता कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही, असं मानलं जात असे. पण, डॉ. मनमोहन सिंह यांनी हे मिथक तोडलं. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्य़मंत्री नोएडामध्ये गेल्यावर तो पुन्हा सत्तेत येत नाही, असं मानलं जात असे. योगी आदित्यनाथ यांनी हे मिथक तोडलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world