जाहिरात

लोकसभेनंतर आता विधानसभेवर दावा, सांगलीत काँग्रेसचं काय चाललंय?

काँग्रेसमध्येच आता दोन गट दिसत आहे. मदन भाऊ पाटील गटाने सांगली विधानसभेवर दावा केला आहे. या गटाचे नेतृत्व मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या करत आहेत.

लोकसभेनंतर आता विधानसभेवर दावा, सांगलीत काँग्रेसचं काय चाललंय?
सांगली:

सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय नोंदवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे काही काळ महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत आघाडीचा धर्म पाळला गेला नाही असे वक्तव्य केले होते. शिवाय विधानसभा निवडणुकीला पाहू असा सुचक इशाराही दिला होता. आत काँग्रेसनेही आक्रमक भूमीका घेतली आहे. मात्र काँग्रेसमध्येच आता दोन गट दिसत आहे. मदन भाऊ पाटील गटाने सांगली विधानसभेवर दावा केला आहे. या गटाचे नेतृत्व मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या करत आहेत. या गटाने नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित केला आहे. त्यावेळी जोरादर शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगली विधानसभेवर जयश्री पाटील यांचा दावा? 

लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यात सांगली विधानसभेवर मदन भाऊ पाटील गटाने दावा केला आहे. लोकसभेत मदन भाऊ पाटील गटाने विशाल पाटील यांना साथ दिली होती. शिवाय जयश्री पाटील यांनीही विशाल यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता.  मदन भाऊ पाटील विचार मंत्री संपुर्ण ताकदीने विशाल पाटील यांच्या मागे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता विचार मंचाच्या माध्यमातून विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यात जयश्री पाटील गट शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. जयश्री पाटील या सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडू इच्छुक आहेत. तसा दावाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच केला आहे. 

हेही वाचा - महायुतीत वाद पेटला! शिंदेंच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटीलही इच्छुक 

सांगली विधानसभेची जागा गेल्या वेळी काँग्रेसने लढवली आहे. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्यासाठी ते इच्छुक आहेत. शिवाय नुकत्यात पार पडलेल्य लोकसभा निवडणुकीत सांगली विधानसभेतून विशाल पाटील यांना जवळपास 19 हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे इथून आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी इच्छा पृथ्वीराज पाटील यांची आहे. पाटील सध्या सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र मदनभाऊ पाटील गटाने काय कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. 

हेही वाचा -  आगामी निवडणुकीत NCP सर्वाधिक जागा लढवेल, मविआमध्ये दबावाच्या राजकारणाला सुरूवात

काँग्रेस समोर पेच 

सांगली विधानसभेत काँग्रेसचे दोन गट आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोणत्या गटाला उमेदवारी द्यायची असा पेच काँग्रेस श्रेष्ठीं समोर असणार आहे. लोकसभेला सर्वांनी मिळून काम केले होते. त्याचा परिणाम म्हणून विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले. आता हे मताधिक्य टिकवण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे. जर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण झाल्यास भाजपला इथे हॅटट्रिक करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आधी महाविकास आघाडीत ही जागा स्वत: च्या पदरात पाडून घ्यावी लागेल. त्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित करावी लागेल. असे काँग्रेस पुढचे आव्हान असेल. त्यात शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकीनंतर दुखावला गेला आहे. त्यामुळे त्यांची भूमीकाही महत्वाची ठरवणार आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी तर विधानसभेला जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढेल असे स्पष्ट केले आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com