रामराजे शिंदे, प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी मोठा आरोप केला आहे. ठाकरे मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांना दिल्लीत कुणी भाव दिला नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केलेल्या आरोपीचीही भेट घेतल्याचा आरोप म्हस्के यांनी केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरेश म्हस्केंचा मोठा आरोप
उद्धव ठाकरे यांना दिल्लीत कुणीही भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना नाचवू शकतो, हे दाखवून दिले. उद्धव ठाकरे हॅाटेल ऐवजी राऊत यांच्याच घरात राहतात. संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांची दक्षिण आफ्रिकेतील घोटाळ्यातील आरोपी गुप्ता बंधूपैकी एकाची भेट घेतली, अशी माहिती माझ्याकडं आहे, असा दावा म्हस्के यांनी केला.
'निवडणुकीत फंड गरजेचा असतो. फंड गोळा करण्याचा हा दौरा होता. दक्षिण आफ्रिकेत घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांची भेट घेण्यासाठी हा दौरा होता. गुप्ता बंधूंनी करोडोंचा घोटाळा केला आहे. त्यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे. संजय राऊत यांनी गुप्ता बंधूंची भेट घडवून आणली. 7 तारखेला दुपारी ही भेट झाली. संजय राऊत यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे,' अशी मागणी म्हस्के यांनी केली.
( नक्की वाचा : 'मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न', राज ठाकरेंचा गंभीर आरोप! पवार, उद्धव यांना सुनावलं )
'राष्ट्रवादी काँग्रेसमधील मित्रांना मुख्यमंत्री करायचं किंवा स्वतः संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनायचंय आहे. या प्रकरणातून उद्धव ठाकरे यांना अडकवण्याचं काम संजय राऊत करत आहेत,' असा आरोपही म्हस्के यांनी केला.
कोण आहेत गुप्ता बंधू ?
आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. झुमा 2018 साली अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तिथे त्यांना अटकही झाली होती.
मुळचे उत्तर प्रदेशच्या असलेल्या अतुल गुप्ता यांनी पहिल्यांदा चपलांचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर कॉम्पुटर, खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा आणि माध्यम या उद्योगांमध्ये स्वतःचा विस्तार केला. कंपनीच्या एका कामानिमित्त 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी जेकब झुमा यांची भेट घेतली.
( नक्की वाचा : अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक )
झुमा 2009 ते 2018 पर्यंत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. गुप्ता बंधूंवर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी झुमाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले.
झुमांवरच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी झोंडो कमिशन स्थापन करण्यात आले. कमिशनच्या अहवालातही झुमा यांच्यासह गुप्तांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world