संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी तीव्र झाली आहे. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रीया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. पवार घराण्यात होणाऱ्या या लढतीमध्ये शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे देखील उतरले आहेत. शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका करत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय.
बंड नाही कर्तव्य!
बारामती लोकसभा निवडणूक आपण लढवणार, आता माघार नाही. हे शिवतारेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्याचबरोबर आपलं हे बंड नाही, असा दावाही त्यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 लाख 86 हजार मतदार हे पवारांच्या बाजूचे आहेत. तर, पवारविरोधी 5 लाख 50 हजार मतदार आहेत. पवारांच्या बाजूचे मतदार विभागले जातील पण पवारविरोधी मतदारांनी काय करावं? सर्व तालुक्यातील पवारांना विरोध करणारे लोक माझ्याकडं येत आहेत. मी बंड केलेलं नाही. पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक लढवून लोकशाहीतील कर्तव्य करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
कुणाचा सातबारा नाही!
बारामती हा देशातील 543 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे, हा कुणाचा सातबारा नाही. बारामतीमधील आणखी कुणी हवा, फक्त पवार कुटुंबीयच का? या प्रस्थापितांच्या विरुद्ध, घराणेशाहीच्या विरुद्ध ही लढाई आहे. आम्ही 41 वर्ष त्यांना मत देतोय, त्याबदल्यात आम्हाला काय मिळालंय? असा सवाल त्यांनी विचारला.
रागाचं कारण काय?
अजित पवार युतीमध्ये आले त्यावेळी मी स्वत:हून त्यांना पहिल्याच दिवशी भेटलो. त्यांचा सत्कार केला. पण, त्यांची गुर्मी जाणार नाही. त्यामुळेच कदाचित नियतीनं मला दिलेलं हे ऐतिहासिक काम असेल. मी 2014 आणि 19 ला प्रयत्न केला होता. जाणकरांच्या वेळीस मला उमेदवारी दिली असती तर मी त्याचवेळी निवडून आलो असतो असा दावा त्यांनी केला.
विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या रागाचं खरं कारणही सांगितलं. 'गुजवणीच्या धरणासाठी मी 2012 मध्ये उपोषण केलं. त्यावेळी ते पालकमंत्री होते. नऊ दिवस पालकमंत्री असताना शेवटपर्यंत आलेच नाहीत. दुर्दैवानं त्यात माझी किडनी गेली. हार्ट सर्जरी करावी लागली. मी मृत्यूला कवटाळून परत आलो.
अर्थमंत्री असताना त्यांनी या धरणासाठी एक रुपया दिला नाही. बारामतीच्या एसटी स्टँडसाठी 60 कोटी रुपये दिले. साडे चार लाख लोकसंख्येला पाणी पुरवणाऱ्या योजनेला 25 कोटीही दिले नाही. माझा त्यांच्यावर हा राग आहे. माझ्या पुढच्या 10 पिढीच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माझं वैयक्तिक सोडा पण माझ्या लोकांशी जो खेळ करणार त्याचा मी खेळ करणार, असं शिवतारे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं.