रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या आधी त्यांनी सासरे एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी खडसे यांनीही रक्षा यांना आशिर्वाद देत त्यांच्या विजयासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - आढळराव नाही तर 'हे' होते शिरूरचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
खडसेंचे घेतले आशिर्वाद
रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले. मोठ्यांचे आशिर्वाद घेणे गरजेचे आहे. मी सर्वांचे आशिर्वाद घेतले आहेत असे यावेळी रक्षा खडसे म्हणाले. नाथाभाऊ त्यांच्या पद्धतीने माझा प्रचार करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचेही आशिर्वाद घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान शक्तीप्रदर्शन करत त्या उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आशिर्वाद काय दिला?
रक्षा खडसे ही माझी सून नसून मुलगी आहे. लवकरच मी देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांना निवडणुकीसाठी मदत करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होतील असा माझा विश्वास यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
रावेर लोकसभेतून हॅट्रीक करणार?
रक्षा खडसे या रावेर लोकसभेतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत. या आधी दोन वेळा त्या या मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. विजयाची हॅट्रीक करण्याची संधी त्यांच्या समोर आहे. यावेळी रावेर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात खडसे विरूद्ध पाटील यांच्यात लढत होणार आहे. पाटील यांच्या उमेदवारीने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world