देविदास राखुंडे
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आता 24 जून रोजी म्हणजेच मंगळवारी प्रत्यक्षात मतमोजणी होणार आहे. माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी त्यानंतर ठरणार आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीला आता काही तास शिल्लक आहेत. मात्र त्याच्या निकालाबाबतची प्रचंज उत्सुकता निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बारामतीच्या राजकारणातील महत्त्वाची संस्था आहे. तब्बल 37 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 19,000 हून अधिक शेतकरी सभासद आहेत. मागील पाच वर्षाच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शना खालील संचालक मंडळ काम करत होतं. आता मात्र स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी तावरे गटाने सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना कडवं आव्हान दिले आहे.
आतापर्यंत बारामतीतून अजित पवारांचा किल्ला अभेद्य राहिलाय, तरी देखील अजित पवारांना माळेगाव जिंकण्यासाठी बारामतीत ठाण मांडावं लागलं. एक दोन हवे तर तब्बल बारा जाहीर सभा अजित पवारांना घ्याव्या लागल्या आणि त्याच कारण आहे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांसमोर उभा केलेलं कडवं आव्हान.
सुरुवातीला अजित पवार- शरद पवार गटाला काही जागा देतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ही निवडणूक लढवतील असं चित्र होतं. मात्र 13 जून रोजी अजित पवारांनी शरद पवार गटाला एकही जागा न देता श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे आपसूकच शरद पवार गटाला बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं लागलं. मात्र शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. दुसरीकडे कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात कष्टकरी शेतकरी पॅनलने ही आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत.
मतदान झालं आता केवळ फक्त मतमोजणी बाकी आहे. यामध्ये अजित पवारांच पॅनल विजयी झालं तर बारामतीच्या राजकारणातून शरद पवारांची पकड सैल होत चालली की काय असा प्रश्न उपस्थित होईल. जर गालबोट लागलं तर अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. रविवारी 22 जून रोजी माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात तब्बल 88 टक्के मतदान झाले. आता या मतदानाची मोजणी पार पाडणार आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तावरे गटाचे नेते सहकार महर्षी चंद्रराव तावरे चेअरमन पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ टाकणार हे पाहणं महत्वाचं असेल.