Indian Women's Cricket Team Coach Amol Muzumdar's Story : भारतीय महिला क्रिकेट टीमने (Indian Women's Cricket Team) यावर्षी इतिहास घडवत पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कपचे (Women's ODI World Cup 2025) विजेतेपद पटकावलं. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (2 नोव्हेंबर 2025) झालेल्या फायनलमध्ये Harmanpreet Kaur च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 रनने धूळ चारली आणि ही ऐतिहासिक ट्रॉफी आपल्या नावे केली. या विजयानंतर भारतीय टीम आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरचं जितकं कौतुक होतंय, त्याहून अधिक चर्चा होतेय ती या यशाचा खरा शिल्पकार, हेड कोच अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याची!
सर्वांनी दिलं अमोलला श्रेय
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा प्रवास काही सोपा नव्हता. स्पर्धेच्या मध्यभागी टीमने सलग 3 सामने गमावले होते. या कठिण परिस्थितीतून सावरत, कमालीच्या जिद्दीने खेळ करत टीमने पुनरागमन केलं. सेमी फायनलमध्ये, तब्बल 7 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (Australia) टीम इंडियाने 5 विकेट्सने हरवलं आणि फायनलमध्ये धडक मारली.
या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कॅप्टन हरमनप्रीतसह टीममधील प्रत्येक खेळाडूने वेळोवेळी कोच अमोल मुझुमदारला दिलंय. त्याच्याच मार्गदर्शनाखाली टीमने ही उंची गाठली, असं भारतीय फॅन्सही आता कृतज्ञतापूर्वक मानत आहेत.
( नक्की वाचा : Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुझुमदार कोण आहे? )
निवृत्तीपर्यंतचा वेटिंग मोड!
आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही सामना न खेळता वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कोच बनणं, हे अमोल मुझुमदारच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) अमोल मुझुमदारने केलेल्या योगदानाला तोड नाही. एक काळ असा होता की, त्याच्याकडे भविष्यातील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणून पाहिलं जात होतं.
पण, अमोलचं नशीब लहानपणापासूनच 'वेटिंग'वर राहिलं. याची सुरुवात शालेय क्रिकेटमधून झाली, जेव्हा 1988 मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने शारदाश्रमकडून खेळताना 664 रनची विक्रमी भागीदारी केली. त्या ऐतिहासिक क्षणी, अमोल पॅड बांधून संधीची वाट पाहत होता. सचिन-विनोद त्या इनिंगमध्ये आऊट झालेच नाहीत आणि अमोलला बॅटिंगची संधी मिळाली नाही!
हा वेटिंग मोड निवृत्तीपर्यंत कायम राहिला. दोन दशके देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रमी रन आणि योगदानाची रास रचूनही त्याला कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. याच कारणामुळे अमोल मुझुमदारला क्रिकेट विश्वातील 'कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळू शकलेला, सर्वोत्तम बॅटर' म्हणून ओळखलं जातं.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
देशांतर्गत क्रिकेटमधील विक्रमी कारकीर्द
अमोल मुझुमदारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी का मिळाली नाही? हा प्रश्न तो खेळत असतानाही विचारला गेला आणि आता महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तर या प्रश्नाचा आवाज आणखी वाढलाय. त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते.
फर्स्ट क्लास (First-Class) क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारने 171 मॅच खेळल्या. यात त्याने 11,167 रन केले. यात 30 सेंच्युरी आणि 60 हाफ सेंच्युरी आहेत.
लिस्ट-A (List-A) क्रिकेटमध्ये अमोलने 113 मॅचमध्ये 3,286 रन केले. यामध्ये त्याने 3 सेंच्युरी आणि 26 हाफ सेंच्युरी झळकावल्या.
अमोलची आंतरराष्ट्रीय संधी का हुकली?
देशांतर्गत स्पर्धेत धावांचा डोंगर उभारूनही अमोल मुझुमदारला टीम इंडियात स्थान न मिळण्याची 4 कारणे खालीलप्रमाणे आहेत:
1. राहुल द्रविडसोबतची स्पर्धा
राष्ट्रीय टीममधील जागेसाठी अमोलची थेट स्पर्धा कर्नाटकच्या Rahul Dravid याच्यासोबत होती. 1995 मध्ये इंग्लंडचा 'अ' संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारताच्या 'अ' संघात अमोल आणि राहुल दोघेही होते. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत अमोल फेल गेला, तर राहुल द्रविडने उत्तम खेळ करून निवड समितीला प्रभावित केलं. अमोलने निवड समितीला प्रभावित करण्याची मोठी संधी याच दौऱ्यात गमावली.
2. द्रविड-गांगुलीची एन्ट्री
पुढील वर्षी, 1996 मध्ये दुलिप करंडक स्पर्धेत अमोलसाठी पुन्हा एक संधी होती. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीममध्ये बॅटरसाठी फक्त 2 जागा शिल्लक होत्या. या 2 जागांसाठी राहुल द्रविड, व्हिव्हिएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि अमोल मुझुमदार यांच्यात स्पर्धा होती. यात द्रविड आणि गांगुलीने बाजी मारली आणि लॉर्ड्स कसोटीत पदार्पण केलं. यानंतरचा त्यांचा प्रवास ऐतिहासिक आहे.
3. 'सुपर फोर' चे अबाधित स्थान
अमोल मुझुमदार हा मधल्या फळीतील (Middle Order) बॅटर होता. ज्या काळात अमोल मुझुमदार फॉर्ममध्ये होता, त्याच काळात टीम इंडियात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण या 'सुपर फोर' दिग्गज बॅटर्सचं स्थान अबाधित होतं. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये कितीही चांगली कामगिरी करूनही अमोल कायम वेटिंग मोडवरच राहिला.
4. इतरांना संधी पण, अमोलला का नाही?
अमोलच्या मुंबई टीममधील वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले या सहकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पण, जाफर सलामीचा बॅटर होता, तर इतर दोघं बॉलर असल्यानं त्यांना वेगळ्या जागांवर संधी मिळाली. भारतीय क्रिकेटमधील 'सुपर फोर' दिग्गजांची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आली, तेव्हा अमोल मुझुमदारचंही वय वाढलं होतं. त्यामुळे निवड समितीने साहजिकच तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी देण्यास सुरुवात केली.
देशातील एक सर्वोत्कृष्ट बॅटर असूनही, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताच अमोल मुझुमदारला अखेरीस निवृत्ती स्वीकारावी लागली. पण, आज त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकून, 'वेटिंग'मधील या महान खेळाडूने आपल्या योगदानाची महती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world