जाहिरात

IND vs Eng 4th Test: टीम इंडियाला चौथ्या कसोटीआधी दोन धक्के; आकाशदीप पाठोपाठ 'हा' ऑलराऊंडर संघाबाहेर?

IND vs Eng 4th Test: टीम इंडियाला चौथ्या कसोटीआधी दोन धक्के; आकाशदीप पाठोपाठ 'हा' ऑलराऊंडर संघाबाहेर?

IND vs Eng 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या दुखापतीनंतर आता अष्टपैलू नितीश रेड्डी (Nitish Reddy) देखील मालिकेतील उर्वरित सामन्यांतून बाहेर पडल्याचं समोर येत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश रेड्डीला रविवारी जिममध्ये ट्रेनिंग करत असताना गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. स्कॅन रिपोर्टमध्ये त्याच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुखापतीमुळे नितीश मँचेस्टर आणि ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटचे दोन्ही कसोटी सामने खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही दुखापत इतकी गंभीर आहे की, तो पूर्ण मालिकेतूनच बाहेर झाला आहे. नितीश रविवारी मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंना भेटायला गेलेल्या टीम इंडियासोबत नव्हता.

(Andre Russell Retirement : वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरची निवृत्ती, 17 फोटो शेअर करून म्हणाला, Thank You!)

या दोन्ही खेळाडूंचे चौथ्या कसोटीतून बाहेर होणे भारतासाठी मोठे नुकसान आहे, कारण याचा थेट परिणाम भारतीय संघाच्या प्लेइंग 11 वर होणार आहे. आता हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल संघाचे संतुलन कसे राखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नितीश रेड्डीने या मालिकेत 3 पैकी 2 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या 2 सामन्यांमधील 4 डावांमध्ये त्याने 15 च्या सरासरीने एकूण 52 धावा केल्या. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 30 होती. तर, गोलंदाजी करताना त्याने 28 षटकांमध्ये 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले होते. रेड्डीने संघाला फायदेशीर अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. 

(WCL 2025: WCL स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! कधी अन् कसे पाहाल सामने? पाहा संपूर्ण शेड्यूल)

टीम मॅनेजमेंटने आकाश दीपच्या जागी यापूर्वीच हरियाणाचा मध्यमगती गोलंदाज अंशुल कंबोजला बॅक-अप खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले आहे. कंबोज लवकरच संघासोबत रुजू होईल.  मात्र, नितीश रेड्डीच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. टीम इंडियासाठी हा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने, या दुखापतींनी संघाची डोकेदुखी वाढवली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com