जाहिरात

क्रिकेट, हॉकी आणि बुद्धिबळ, भारताच्या यशामागचं दक्षिण आफ्रिका कनेक्शन माहिती आहे का?

पॅडी अपटन यांच्याच मार्गदर्शनाखाली याआधी भारताने 2011 साली वन-डे विश्वचषकाचं, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीत ब्राँझ पदक मिळवलं आहे. यानंतर गुकेशसारख्या युवा खेळाडूला मदत करत पॅडी अपटन यांनी पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

क्रिकेट, हॉकी आणि बुद्धिबळ, भारताच्या यशामागचं दक्षिण आफ्रिका कनेक्शन माहिती आहे का?
मुंबई:

वयाच्या 18 व्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या वर्चस्वाला आव्हान देत भारताच्या डी. गुकेशनचं विजेतेपद आपल्या नावे केलं. जागतिक पातळीवर अजिंक्यपद पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू हा मान पटकावल्यामुळे गुकेशवर सध्या चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. याआधीही गुकेशने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. परंतु जागतिक अजिंक्यपद सारख्या महत्वाच्या स्पर्धेत मिळालेलं हे यश खऱ्या मोठं मानलं जात आहे.

डी. गुकेशने मिळवलेल्या या यशामागे एका अशा व्यक्तीचा हात आहे ज्याने याआधीही भारताला क्रिकेट आणि हॉकीमध्ये जागतिक पातळीवर मोठं यश मिळवून दिलं आहे. ही व्यक्ती आहे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच पॅडी अपटन. पॅडी अपटन यांच्याच मार्गदर्शनाखाली याआधी भारताने 2011 साली वन-डे विश्वचषकाचं, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीत ब्राँझ पदक मिळवलं आहे. यानंतर गुकेशसारख्या युवा खेळाडूला मदत करत पॅडी अपटन यांनी पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

बुद्धीबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणं हे प्रत्येक खेळाडूसाठी खडतर मानलं जातं. अनेकदा हा सामना फक्त तुम्ही शिकलेल्या चालींचा नाही तर मानसिकतेचाही होतो. मॅग्नस कार्लसनसारखा विख्यात बुद्धिबळपटूही आपली पहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळत असताना थोडासा विचलीत झाला होता.

हे ही वाचा - FIDE World Chess : भारताच्या डी गुकेशची ऐतिहासिक कामगिरी, सर्वात कमी वयात बनला चॅम्पियन

विजेतेपदाच्या लढाईत गुकेशची सुरुवातच झाली खराब -

डिंग लिरेनला आव्हान देत असताना विजेतेपदासाठीच्या लढतीत गुकेशला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. पहिल्याच सामन्यात झालेला पराभव आणि त्यानंतरच्या सामन्यात विजय शक्य असतानाही झालेला पराभव गुकेशसाठी धक्कादायक होता. परंतु यानंतर गुकेशने जो खेळ केला तो निव्वळ अविश्वसनीय होता.

एखाद्या हुशार मुलाप्रमाणे गुकेशने प्रत्यके बाबीचा केला अभ्यास -

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत पॅडी अपटन यांनी गुकेशच्या मेहनतीबद्दल भाष्य केलं. "जर तुम्हाला एखाद्या परीक्षेत चांगली कामगिरी करायची असेल तर संपूर्ण पुस्तकाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हाच तुम्ही परीक्षेत आत्मविश्वासाने जाऊ शकता. केवळ आशेच्या जोरावर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. याच पद्धतीने गुकेशने अंतिम सामन्यासाठी संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला. स्पर्धेदरम्यान किती वेळ झोपायचं, पडत्या काळात स्वतःला कसं सावरायचं, तसेच प्रत्येक क्षणांचा कसा सामना करायचा याचा अभ्यास करुन गुकेश अंतिम सामन्यात उतरला होता."

छोट्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष -

गेले 6 महिने पॅडी अपटन गुकेशसोबत वेळ घालवत होते. मानसिकदृष्टीने गुकेश कणखर रहावा यासाठी त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. अंतिम सामन्यातही डिंग लिरेन जेव्हा आपली चाल खेळण्यासाठी वेळ घेत होता, तेवढ्या वेळेत गुकेश आपले डोळे बंद करुन ध्यान एकवटण्याचा प्रयत्न करत होता. FIDE ने दिलेल्या अधिकृत माहितीच्या जोरावर गुकेशने विजेतेपदाच्या लढतीत किमान अर्धा तास डोळे बंद करुन होता. संपूर्ण सामन्यात डिंग लिरेनचं लक्ष हे गुकेशकडे होतं परंतु गुकेशचं लक्ष हे आपल्या बुद्धिबळाच्या पटाकडे होतं.

एखादी चाल खेळताना किती वेळ घ्यावा आणि समोरचा खेळाडू आपली चाल खेळत असताना पुढची चाल खेळण्यासाठी किती वेळ घ्यावा यासारख्या गोष्टींचाही पॅडी अपटन आणि गुकेश यांनी अभ्यास केला होता. एखाद्या सामन्यात आपण पुढे असू तर कसं व्यक्त व्हावं, मागे असू तर कसं व्यक्त व्हावं या सारख्या गोष्टींचाही गुकेश आणि पॅडी अपटन यांनी अभ्यास केला होता.

"अंतिम सामन्यात जो काही निकाल लागेल त्यासाठी गुकेश हा सर्वार्थाने तयार होता. जेव्हा सर्वार्थाने तयार असं म्हणतो त्यात आपली झोप, आपलं खाणं-पिणं, आपला व्यायाम या सर्व गोष्टींचा समावेश होतो. सामन्यादरम्यान आणि सामन्याआधी आपली मानसिकता कशी असावी हे देखील त्याने शिकून घेतलं होतं. यासाठी त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचं तितकंच श्रेय आहे. केवळ आशेच्या जोरावर गुकेश अंतिम सामन्यात उतरला नव्हता", असं अपटन म्हणाले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com