
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेऱ्यात अडकलेल्या या संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद वैध याचा वाद थेट कोर्टात पोचला होता. अखेर रविवारी पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
हे ही वाचा - Hulk Hogan: WWE मधील पर्व संपले, सुपरस्टार हल्क होगनचे निधन!
आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एमपीएल यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. तसेच गेल्यावर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्यामाध्यमातून भरवण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या भरवली होती. आता तर त्यांनी कुस्तीगिर परिषदेच्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर मजल मारली आहे.

स्व. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेची मुहूर्तमेढ रोवली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेली चाळीस वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांनी चालणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. विविध पदके प्राप्त केलेल्या अनेक गुणवान पैलवानांना शासनामध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. श्री. शरद पवार यांच्या याचे हेच काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता त्यांचेच नातू आमदार रोहित पवार यांच्यावर आली आहे. क्रिकेटमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे एमपीएलचा यशस्वी प्रयोग करुन राज्यातील होतकरु क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले त्याचप्रमाणे आता कुस्तीमध्ये ते कोणता प्रयोग करतात, याकडे राज्याच्या तमाम कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. अनंत बदर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील गुणी व होतकरु पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आदरणीय पवार साहेबांनी या संघटनेत केलेलं काम माझ्यापुढं दीपस्तंभाप्रमाणे असून यापुढंही आम्हाला सर्वांनाच त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. या निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे मनापासून आभार !
- रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world