T20 World Cup 2024 Semi Final : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अपराजित असलेल्या टीम इंडियानं स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. टीम इंडियानं सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केलाय. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत इंग्लंड विरुद्ध होणार आहे. गयानामध्ये गुरुवारी रात्री 8 वाजता हा सामना सुरु होणार आहे. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्या मॅचमध्ये इंग्लंडनं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय टीमला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मॅचवर पावसाचं सावट
भारतीय टीमनं 2007 साली झालेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर टीम इंडियाला टी20 चॅम्पियन होता आलेलं नाही. या स्पर्धेतील दमदार कामगिरी पाहून यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपेल, अशी फॅन्सना मोठी आशा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सेमी फायनलसाठी फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण, त्यांच्या या उत्साहावर विरजण पडू शकतं. कारण, या मॅचवर पावसाचं सावट आहे.
AccuWeather नुसार मॅचच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे मॅच उशीरा सुरु होऊ शकते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ते सकाळी 3.30 पर्यंत) पावसाची शक्यता 35 ते 68 टक्के आहे. त्याचबरोबर मॅचच्या दरम्यान गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर ढगांची गर्दी असेल. मॅच दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता नाही. पण, सतत होणाऱ्या पावसामुळे मॅचला विलंब होऊ शकतो.
ट्रेंडींग बातमी - भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप
हवामान विभागानुसार गयानामध्ये गुरुवारी सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मॅचसाठी कोणताही रिझर्व्ह डे नाही. अर्थात या सामन्यासाठी 250 मिनिटं अतिरिक्त वेळ आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्याचबरोबर सेमी फायनलसाठीच्या नव्या नियमानुसार मॅचचा निकाल लागण्यासाठी दोन्ही इनिंगमध्ये किमान 10 ओव्हर्सचा खेळ आवश्यक आहे.सुपर 8 मध्ये मॅचचा निकाल लागण्यासाठी 5-5 ओव्हर्सचा खेळ आवश्यक होता.
मॅच रद्द झाली तर काय होणार?
भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही तरी भारतीय फॅन्सना काळजीचं कारण नाही. हा सामना रद्द झाला तर भारतीय टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण, पॉईंट टेबलनुसार टीम इंडिया सध्या टॉपवर आहे.