Virat Kohli : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात (RCB vs KKR) भर मैदानात व्यक्त केलेला संताप विराट कोहलीला भोवला आहे. हर्षित राणाच्या बॉलिंगवर थर्ड अंपायरनं विराटला आऊट दिलं होतं. विराटला या निर्णयावर विश्वास बसला नाही. त्यामुळे तातडीनं तीव्र नाराजी नोंदवत मैदान सोडलं होतं. या कृतीसाठी त्याच्यावर कारवाई होणार हे तेंव्हाच स्पष्ट झालं होतं. बीसीसीआयनं त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.
काय झाली कारवाई?
विराट कोहलीच्या मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. त्याला खेळ आचारसंहिता 2.8 मधील लेव्हल 1 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. मॅच संपल्यानंतर रेफ्रीसमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आलाय. विराटनं त्याची चूक मान्य करत शिक्षा मान्य केलीय. मॅच रेफ्रीचा हा निर्णय अंतिम असून त्याचं पालन करणे अनिवार्य आहे.
( नक्की वाचा : विराट कोहली Out की Not Out? इराफानच्या व्हिडिओनंतर कैफची पोस्ट व्हायरल )
विराट कोहली आऊट झाल्यानंतर केकेआरचे खेळाडू जल्लोष करत होते. त्यावेळी विराट स्वत: अंपायरच्या निर्णायवर नाराज दिसला. त्यानं तातडीनं रिव्ह्यू घेतला. हर्षित राणाचा बॉल उंच होता पण तो विराटच्या बॅटवर पोहचेपर्यंत खाली आला होता. विराटनं तो खेळला त्यावेळी तो थोडा खाली वाकला होता. त्यामुळे नियमांचा आधार घेत अंपायरनं तो वैध बॉल असल्याचं जाहीर केलं. थर्ड अंपायरचा निर्णय आपल्याविरुद्ध गेल्याचं लक्षात येताच विराट भडकला. तो मैदानातील अंपायरच्या जवळ गेला आणि त्यांच्यावर नाराजी नोंदवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना चांगलाच रंगतदार झाला. केकेआरनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 आऊट 222 रन केले. या मोठ्या धावसंख्येनंतरही केकेआरला फक्त 1 रननं कसाबसा विजय मिळाला. आरसीबीचा 8 सामन्यातील हा सातवा पराभव असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आलंय.