BCCI Official Death Mumbai Hotel: आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं होतं. वानखेडे स्टेडियमवर मुंबईने 13 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचं मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनं जोरदार सेलिब्रेशन केलं.
मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. या विजयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील प्रसिद्ध पंचतारांकित ट्रायडन्ट हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट टीममधील एका ज्येष्ठ सदस्याचा मृतदेह त्यांच्या रूममध्ये आढळून आला असून या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
इयान विल्यम लेग्नफोर्ड असे या 76 वर्षीय ब्रिटीश नागरिकाचे नाव असून ते बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग टीममधील एक अत्यंत अनुभवी सदस्य होते. आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची तांत्रिक जबाबदारी सांभाळण्यासाठी ते मुंबईत आले होते. 24 मार्चपासून ते ट्रायडन्ट हॉटेलमधील रूम नंबर 2715 मध्ये मुक्कासाला होते.
29 मार्च रोजी वानखेडेवरील सामन्याचे आपले काम संपवून ते उशिरा हॉटेलवर परतले होते. मात्र, 30 मार्चच्या सकाळी जेव्हा हॉटेलच्या रिसेप्शनवरून त्यांना फोन करण्यात आला, तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही उत्तर न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साहाय्याने रूम उघडली आणि आतले दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले.
( नक्की वाचा : IPL 2026: बदला पूर्ण! सीएसकेनं सोडलं आणि जड्डूनं इंगा दाखवला, पहिल्याच ओव्हरमध्ये दिसला रुद्रावतार, VIDEO )
हॉटेलच्या रूममध्ये बेशुद्ध
हॉटेल कर्मचारी जेव्हा रूममध्ये शिरले, तेव्हा विल्यम लेग्नफोर्ड हे बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणाचा ताबा घेतला. प्राथमिक तपासात आणि शवविच्छेदन अहवालात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. तरीही पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. एका परदेशी नागरिकाचा अशा प्रकारे प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.
बीसीसीआयने काय सांगितलं?
या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृत पत्रक काढून शोक व्यक्त केला आहे. विल्यम लेग्नफोर्ड हे आमच्या ब्रॉडकास्ट टीमचे अविभाज्य घटक होते आणि त्यांच्या निधनाने बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयपीएल गवर्निंग कौन्सिलने लेग्नफोर्ड यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात त्यांच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मैदानावर खेळाडूंच्या सुरक्षिततेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे बोर्डाने नमूद केले आहे.
पडद्यामागच्या कलाकाराचा अंत
आयपीएलचे सामने आपण टीव्हीवर ज्या स्पष्टतेने पाहतो, त्यामागे विल्यम लेग्नफोर्ड यांच्यासारख्या तंत्रज्ञांची मोठी मेहनत असते. वयाच्या 76 व्या वर्षीही ते क्रिकेटप्रती असलेल्या ओढीमुळे या कामात सक्रिय होते. मुंबई इंडियन्सच्या विजयाने वानखेडे स्टेडियम गाजत असतानाच, हे सामने जगभरात पोहोचवणारा एक मोहरा शांत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे आयपीएल ब्रॉडकास्ट टीमवर दुःखाचे सावट पसरले असून, क्रिकेटप्रेमींकडूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.