जाहिरात

मांजरेकर आणि गंभीर यांच्यात पुन्हा शाब्दिक युद्ध पेटणार, मांजरेकरांची जळजळीत टीका

गौतम गंभीर हा कोणताही आडपडदा न ठेवता बोलणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. गंभीर याला विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या फॉर्मसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

मांजरेकर आणि गंभीर यांच्यात पुन्हा शाब्दिक युद्ध पेटणार, मांजरेकरांची जळजळीत टीका
मुंबई:

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी अचानकरित्या गौतम गंभीरवर टीकास्त्र सोडलं. गंभीर हा भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याने माध्यमांशी संवाद साधला. मांजरेकर यांनी, गंभीर याला कोणाशी कसं बोलावं हे कळत नाही त्याच्याकडे योग्य शब्दांची निवड करण्याचे कौशल्यही नाही असं म्हणत टीका केली. मांजरेकर यांनी X वर पोस्ट करत बीसीसीआयला विनंती केली की गंभीरला पुन्हा माध्यमांसमोर आणले जाऊ नये.

भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी गौतम गंभीर याने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गंभीर याचे नेमके कोणते विधान, उत्तर खटकले ते मात्र संजय मांजरेकर यांनी सांगितलेले नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 कसोटी सामने खेळणार आहे.

नक्की वाचा :भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास BCCI चा नकार

गौतम गंभीर हा कोणताही आडपडदा न ठेवता बोलणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. गंभीर याला विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या फॉर्मसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगनेही कोहलीच्या फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासंदर्भातही गंभीरला प्रश्न विचारण्यात आले. ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मांजरेकरने म्हटले की अशा पत्रकार परिषदांना गंभीरऐवजी कर्णधार रोहीत शर्मा किंवा निवडसमिती प्रमुख अजित आगरकर यांनी जायला हवे. ते माध्यमांना नीटपणे हाताळतात. गंभीरला कसं बोलावं याची शिस्त नाहीये असंही मांजरेकर यांनी म्हटले. पीटीआयने यासंदर्भात मांजरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन किंवा मेसेजला उत्तर दिले नाही.

रोहीतच्या अनुपस्थितीत बुमराह नेतृत्व करणार

गौतम गंभीर याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की जसप्रीत बुमराह हा उपकर्णधार असून रोहीत शर्मा पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुपस्थित असेल तर बुमराह संघाचे नेतृत्व करेल. रोहीत शर्मा पहिली कसोटी खेळू शकला नाही तर के.एल.राहुल हा सलामीवीर म्हणून भूमिका बजावेल असेही गंभीरने सांगितले. भारतीय संघाची दुसरी फळी पर्थला रवाना होणार आहे. मात्र रोहीत या फळीत सामील झाला नाही. रोहीतच्या संघातील समावेशाबाबत अनिश्चितता असून कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी याबाबतची अधिक स्पष्टता येईल असे गंभीर याने सांगितले.

राहुलच्या जोडीला सलामीला कोण?

गौतम गंभीरला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की के.एल.राहुलसोबत अभिमन्यू ईश्वरन हा सलामीला येऊ सकतो. या दोघांनीही ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सामना खेळला आहे. रोहीत जर सामन्यासाठी उपलब्ध झाला नाही तर त्यावेळी यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे गंभीरने सांगितले. आमच्याकडे बरेच पर्याय असून सामन्यापूर्वी यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे गंभीर म्हणाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com