जाहिरात

लग्नाला मुली मिळेना, दारूचं व्यसन, आत्महत्येचा विचार... टीम इंडियाच्या माजी स्टारचा खळबळजनक खुलासा

Laxman Sivaramakrishnan: भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रवासाचा खुलासा केला आहे. नैराश्यातून आत्महत्येचे विचार कसे येत होते, याचा धक्कादायक उलगडा त्यांनी केला आहे.

लग्नाला मुली मिळेना, दारूचं व्यसन, आत्महत्येचा विचार... टीम इंडियाच्या माजी स्टारचा खळबळजनक खुलासा

भारतीय क्रिकेटमधील एकेकाळचा स्टार फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी आपल्या आयुष्यातील कटू सत्य प्रथमच मौन सोडले आहे. केवळ वर्णभेद (Racism) नव्हे, तर समाजाने लावलेल्या खोट्या शिक्क्यांमुळे त्यांना कशा प्रकारे मानसिक नरकयातना सोसाव्या लागल्या, हे ऐकून क्रिकेट विश्व सुन्न झाले आहे.

करिअरच्या सुरुवातीलाच चारित्र्यहनन

वयाच्या 17 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या शिवरामकृष्णन यांना 19व्या  वर्षीच 'मद्यपी' आणि 'अमली पदार्थांचे व्यसनी' असल्याचे लेबल लावले गेले. त्यांनी सांगितले की, "लोक वाईट गोष्टी पसरवण्यात धन्यता मानतात. वयाच्या 19 व्या वर्षी मला हॉटेलमध्ये दारू कोण देणार? मी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत, पण या अफवांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले." द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले.

(नक्की वाचा-  RCB Name Change: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं नाव बदलणार? नव्या मालकांनी काय सांगितलं?)

लग्नासाठी जाहिरात दिली, पण...

या अफवांचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर इतका खोल झाला की, भारतीय क्रिकेटपटू असूनही त्यांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. "माझ्या पालकांनी वैवाहिक जाहिरात दिली होती, ज्यामध्ये मी कसोटी क्रिकेटपटू आणि स्वतःच्या घराचा मालक असल्याचे नमूद केले होते. पण दोन आठवड्यांनंतर पेटी उघडली तेव्हा एकही अर्ज आला नव्हता. लोकांनी माझी बदनामी इतकी केली होती की कुणालाही आपली मुलगी मला द्यायची नव्हती," अशी हृदयद्रावक आठवण त्यांनी सांगितली.

भारतीय क्रिकेटमधून बाहेर आणि नैराश्याचा विळखा

1987 च्या विश्वचषकानंतर त्यांना संघातून काढताना निवडकर्त्यांनी त्यांना 'अनफिट' असल्याचे सांगण्यास सांगितले. परंतु त्यांनी खोटे बोलण्यास नकार दिला. क्रिकेटनंतर त्यांनी कॉमेंट्री क्षेत्रात नाव कमावले, पण कोविड लॉकडाऊनमध्ये ते गंभीर नैराश्याच्या (Depression) गर्तेत अडकले.

(नक्की वाचा-  Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)

आत्महत्येचे विचार

"दुबईत प्रवास करताना वेगवान गाडीतून उडी मारण्याचे विचार मनात येत असत. मी आरशात स्वतःला पाहू शकत नव्हतो," असे त्यांनी कबूल केले. "डोळे मिटले की भयानक प्रतिमा दिसणे आणि झोप न येणे यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली होती. केवळ झोप लागण्यासाठी अल्कोहोलवर अवलंबून राहावे लागले", असं शिवरामकृष्णन यांनी सांगितलं.  शिवरामकृष्णन यांचा हा प्रवास खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com