Puducherry Under-19 coach assualted : क्रिकेट क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पुद्दुचेरी मैदानावर, अंडर-19 क्रिकेट प्रशिक्षक वेंकटरामन यांच्यावर तीन स्थानिक क्रिकेटपटूंनी क्रूरपणे हल्ला केला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघात आपली निवड न होण्यासाठी प्रशिक्षकच जबाबदार असल्याचा संशय आरोपींना होता.
कोण आहेत आरोपी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारनंतर घडली, जेव्हा प्रशिक्षक वेंकटरामन नेट्समध्ये सराव सत्रावर देखरेख करत होते. पोलिसांनी आरोपींची ओळख कार्तिकायन, अरविंदराज आणि संतोष कुमारन अशी पटवली आहे. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी प्रशिक्षकांना संघातून वगळण्याबद्दल जाब विचारला. या वादानंतर तिघांनी मिळून प्रशिक्षकावर क्रिकेट बॅटने हल्ला चढवला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
प्रशिक्षकाला गंभीर दुखापत
या भीषण हल्ल्यात प्रशिक्षक वेंकटरामन यांना खांदा आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्या कपाळावरही गंभीर जखम झाली आहे. कपाळावर त्यांना 20 टाके घालावे लागले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिन्ही आरोपी फरार
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, हा हल्ला पूर्वनियोजित आणि अत्यंत हिंसक होता. तिन्ही संशयित अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
(नक्की वाचा- Pranit More Show: कॉमेडियन प्रणित मोरेचा शो कसा पाहायचा? तिकीट बुकिंगपासून किमतीपर्यंतची संपूर्ण माहिती)
सीएपीच्या सूत्रांनी सांगितले की, असोसिएशन या तपासात पूर्ण सहकार्य करेल आणि पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यावर अंतर्गत कारवाई करेल. सध्या, पुद्दुचेरी पोलिसांचे लक्ष आरोपींना त्वरित अटक करून या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्यावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world