मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या अडचणींमध्ये येत्या काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. अंधेरी परिसरात आपल्या मित्रासोबत फिरायला आलेला असताना पृथ्वी शॉ आणि सपना गिल व तिच्या मित्रपरिवारासोबत वाद झाला होता. या प्रकरणात सपना गिलने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांची चौकशी करायचे आदेश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मेट्रोपॉलिटीअन मॅजिस्ट्रेट एस.सी. तायडे यांनी सपना गिलने केलेल्या आरोपांची चौकशी करुन 19 जुनपर्यंत अहवाल सादर करायचे आदेश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान, सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधात FIR दाखल करुन घेण्यात मुंबई पोलिसांनी टाळाटाळ केल्याचं सांगत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. परंतु ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.
जाणून घ्या नेमकं झालं काय होतं ?
अंधेरी येथील पबच्या बाहेर पृथ्वी शॉ ने आपला विनयभंग केल्याची तक्रार सपना गिलने 2023 मध्ये केली होती. पृथ्वी शॉ ने आपल्याविरोधातले सर्व आरोप फेटाळून लावले होते. पब बाहेर पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढत असताना हा वाद झाला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये, सपना गिलला पृथ्वी शॉ वर हल्ला केल्याप्रकरणी अटक झाली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे.
सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधातील आपल्या तक्रारीत IPC च्या 354, 509, 324 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या घटनेवेळी पृथ्वी शॉ सोबत उपस्थित असलेला त्याचा मित्र आशिष यादववरही गुन्हा दाखव व्हावा अशी मागणी सपना गिलने केली होती.
कोर्टात सुनावणीदरम्यान काय घडलं?
मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉ विरोधात FIR दाखल केली नाही असं म्हणत सपना गिल मॅजिस्ट्रेट कोर्टात आली होती. परंतु यावेळी मुंबई पोलिसांनी सपना गिलचे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं. इतकच नव्हे तर प्रसंग घडला तेव्हा सपना गिल व तिचे मित्र हे दारुच्या नशेत असल्याचंही मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
पृथ्वी शॉ सध्या काय करतोय?
खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर गेलेल्या पृथ्वी शॉ ने काही महिन्यांपूर्वीच मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत सहभाग घेतला. मुंबईला 42 वं विजेतेपद मिळवून देण्यात पृथ्वी शॉ ने ही खारीची भूमिका बजावली. सध्याच्या घडीला पृथ्वी शॉ आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आहे. आपल्या पहिल्या सामन्यात पृथ्वीने 27 बॉलमध्ये 43 रन्स केल्या होत्या. ज्यात चार फोर आणि दोन सिक्स लगावले गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world