जाहिरात

Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन?

Vaibhav Suryavanshi Success Story : वैभव सूर्यवंशीला घडवण्यात व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दोन महान भारतीय क्रिकेटपटूंचे मोठे योगदान आहे.

Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन?
Vaibhav Suryavanshi Success Story : वैभव सूर्यवंशीचा आजवरचा प्रवास सहज झालेला नाही.
मुंबई:

Vaibhav Suryavanshi Success Story : वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या क्रिकेट विश्वात सर्वांच्या तोंडावर आहे. बिहारमधल्या समस्तीपूरच्या वैभवनं फक्त आयपीएलच नाही तर T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. वैभवनं  राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Rajasthan Royals vs Gujrat Titatans) या सामन्यात फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. वैभवनं हा रेकॉर्ड केला त्या दिवशी (28 एप्रिल 2025) त्याचे वय फक्त 14 वर्ष 32 दिवस होते. जगभरातील 14 वर्षांचे क्रिकेटपटू जे स्वप्न बघतात ते स्वप्न वैभव जगला त्यानं ते स्वप्न कल्पनेच्या पलिकडं सत्यामध्ये उतरवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजस्थान रॉयल्सचा हा छोटा चॅम्पियन घडवण्यात व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दोन महान भारतीय क्रिकेटपटूंचे मोठे योगदान आहे. भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करणाऱ्या या दिग्गजांनी वैभवची गुणवत्ता ओळखली. त्याला लगेच मोठा प्लॅटफॉर्म दिला. तो रडला त्यावेळी त्याचे डोळे पुसले. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये त्याच्या वयापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या बॉलर्सची निडरपणे धुलाई करण्याचं कौशल्य त्याच्याकडून घोटून घेतलं.

लक्ष्मणनं पुसले डोळे

भारतीय क्रिकेट व्यवस्थेमध्ये मागच्या बेंचवर असलेल्या बिहारमधून वैभवनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. बीसीसीआयच्या U19 वन-डे चॅलेंजर स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मणनं त्याता खेळ पाहिला.लक्ष्मणनं त्याच्या खेळानं प्रभावित झाला. त्याची बांग्लादेश आणि इंग्लंड विरूद्धच्या U19 सीरिजसाठी निवड व्हावी असा बीसीसीआयकडं आग्रह धरला. वैभवची U19 नॅशनल टीममध्ये एन्ट्री झाली. 

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची 35 बॉलमध्ये सेंच्युरी! मोडले इतके सारे रेकॉर्ड्स...)

वैभवचा त्यानंतरचा प्रवास देखील सोपा नव्हता. आयपीएल पदार्पणातील लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर त्याला रडताना सर्वांनी पाहिलं. असाच एक प्रसंग त्याच्या आयुष्यात यापूर्वी देखील घडलाय. 'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या एका वृत्तानुसार वैभव U19 स्पर्धेत भारत ब (India B) कडून खेळत होता. त्यावेळी एका सामन्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये हा प्रसंग घडला होता.

वैभव त्या सामन्यात 36 रन काढून रन आऊट झाला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये तो रडू लागला. लक्ष्मणनं त्याला रडताना पाहिलं. 'आपण इथं फक्त रन्स पाहत नाही. तर दीर्घकाळ टिकणारं कौशल्य पाहतो', या शब्दात लक्ष्मणनं त्याला समजावलं. 

आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी लक्ष्मणनंच राहुल द्रविडकडे वैभवच्या नावाची शिफारस केली. लक्ष्मणचा सल्ला द्रविडनं मानला.राजस्थाननं त्याला 1 कोटी 10 लाखांना खरेदी केली.

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi  : 'वैभव सूर्यवंशी पुढच्या सिझनमध्ये खेळणार नाही...' वीरेंद्र सेहवागनं दिला गंभीर इशारा )
 

द्रविड गुरुजींची शिकवणी

भारतीय क्रिकेटपटूंमधील गुणवत्ता कमी वयात ओळखणे आणि त्यांना व्यावसायिक क्रिकेटसाठी तयार करण्याचं काम अलिकडच्या काळात राहुल द्रविड इतकं सातत्यानं क्वचितच कुणी केलं असेल. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली U19 वर्ल्ड कप जिंकणारे खेळाडू आज क्रिकेट विश्व  दणाणून सोडतायत. 

राहुल द्रविड सध्या राजस्थान रॉयल्सचा हेड कोच आहे. आयपीएलचे पहिले विजेते असलेले राजस्थान रॉयल्स तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. रविंद्र जडेजा, संजू सॅमसन, रियान पराग, यशस्वी जैस्वाल ही राजस्थान रॉयल्सनं आयपीएलमध्ये पहिली संधी दिलेली प्रमुख नावं. या यादीत आता वैभव सूर्यवंशीची देखील भर पडलीय.

राहुल द्रविडनं वैभवला क्रिकेटचे धडे दिले. वैभवमध्ये गुणवत्ता आहे, पण त्याचा योग्य पद्धतीनं विकास करणे ही आमची जबाबदारी असल्याचं द्रविडनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्याला आयपीएलच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी, अन्य खेळाडूंसोबत सराव करण्यासाठी, हे सर्व अनुभवण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ दिला, असं द्रविडनं सांगितलं. 

वैभवला थेट हजारो प्रेक्षकांच्या समोर खेळायला उभं करण्यापूर्वी या वातावरणाचा सराव होण्याची गरज होती. 14 वर्षांच्या वैभवला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी वेळ हवा होता. तो वेळ द्रविडनं दिला. नेटमध्ये बॅटिंगचे बारकावे शिकवले. मोठ्या मॅचसाठी उपयोगी पडतील अशा युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. वैभव तयार होत आहे हे लक्षात येताच त्याला फार वेळ प्रतीक्षा करायला न लावता त्याला पदार्पणचा संधी दिली. दोन महान खेळाडूंच्या तालमीत तयार होत असलेल्या या 14 वर्षांच्या शिष्यानं केलेली कमाल आता सर्वांनीच अनुभवलीय.