विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र केल्यानंतर आता भारताने यावर अपील केले होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) ने या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेश फोगाट प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. भारताकडून हरिश साळवे, विदुश्पत सिंघानिया यासारख्या निष्णात वकीलांनी विनेशची बाजू मांडली.
सर्वात आधी स्थानिक फ्रेंच वकिलांनी भारताकडून विनेशची बाजू मांडली. ज्यानंतर हरिश साळवे यांनी 1 तास 10 मिनिटे क्रीडा लवादासमोर आपलं म्हणणं मांडलं. IOC आणि UWW च्या वकिलांनीही आपली बाजू मांडली. या प्रकरणाचा लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. भारताची बाजू वरचढ असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे निकाल विनेशच्या बाजूने लागू शकतो. विनेशचा मेडीकल रिपोर्टही क्रीडा लवादाने मागून घेतला आहे
विनेशच्या बाजूने निकाल का लागू शकतो?
- ही केस अशी नाहीये की कोणाचं तरी मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देण्यात आलं आहे.
- विनेश अधिकृतरित्या अंतिम फेरीमध्ये पोहचल्यामुळे ती किमान रौप्य पदकाची दावेदार नक्कीच होती. ज्यामुळे तिला पदक दिल्यास कोणाचाही हक्क हिरावून घेतला किंवा कोणाचंतरी पदक हिरावून घेतलं, असं बोलता येणार नाही.
- याआधीही काही प्रकरणांमध्ये वजन वाढलेल्या खेळाडूंना आयोजकांनी डोळेझाक करत संधी दिल्याची उदाहरणं आहे. भारतीय बाजू ही उदाहरणं सुनावणीदरम्यान मांडू शकतो.
काय आहे प्रकरण?
विनेश फोगाट महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. सामन्याच्या आदल्या दिवशीची विनेशला आपलं वजन वाढल्याचं समजलं होतं. विनेशने लगेचच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केली. दोरी उड्या, सायकलिंग, रक्त काढलं, केसं कापले असे सर्व प्रयत्न करुनही तिचं 100 ग्रॅम वजन जास्त भरलं. त्यामुळे तिला कोणतंही पदक न देता अपात्र ठरवण्यात आलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world