हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. जींद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदार संघातून कुस्तीपटू विनेश फोगाट मैदानात आहे. तिला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. बुधवारी तिने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यातून त्यांच्याकडे किती रोख रक्कम आहे, किती गाड्या आहेत, किती फ्लॅट आहे हे समोर आलं आहे. शिवाय त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाचाही उल्लेख केला आहे.
विनेश यांनी दिलेल्या शपथ पत्रात त्यांच्याकडे दागिने, बँकेत जमा असलेली रक्कम आणि रोख रक्कम अशी एकूण 1 कोटी 10 लाखाची संपत्ती आहे. शिवाय दोन कोटींची जंगम मालमत्ताही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या इन्कम टॅक्स नुसार त्यांचे एकूण उत्पन्न हे 13 लाख 85 हजार रूपये आहे. तर त्यांच्या पतीचे उत्पन्न हे 3 लाख 44 हजार रूपये आहे. शिवाय विनेश यांच्याकडे 35 ग्राम सोने आहेत. त्याची बाजारात किंमत सुमारे 2 लाख 24 हजार रुपये आहे. त्याच बरोबर जवळपास 50 ग्राम चांदी त्यांच्या मालकीची आहे. त्याची किंमत जवळपास साडेचार हजार रूपये आहे.
विनेश फोगाट यांच्याकडे एकूण तीन गाड्या आहेत. त्यात वॉल्वो XC 60 चा समावेश आहे. या गाडीची किंमत 35 लाख रूपये आहे. या शिवाय 12 लाख किंमतीची हुंडाई क्रेटा ही त्यांच्याकडे आहे. तिसरी गाडी ही इनोव्हा आहे. त्याची किंमत ही 17 लाख आहे. या फोर व्हिलर बरोबरच त्यांच्याकडे एक टू व्हिलरही आहे. त्यांच्या पतीकडे स्कॉर्पिओ असून त्याची किंमत 19 लाख रूपये आहे.
फोगाट यांच्याकडे सोनीपतच्या खरखौदा इथे त्यांच्या नावावर एक फ्लॅटही आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 2 कोटीच्या घरात आहेत. विनेश यांच्यावर कर्ज देखील आहे. त्यांनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतले होते. त्यांच्याकडे इनोव्हा कार आहे. त्यासाठी त्यांनी 13 लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
विनेश फोगाट या कुस्तीपटू आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑल्मपिकमध्ये कुस्तीत अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याचे वजन जास्त भरल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती. कुस्तीच्या आखाड्यातून त्या आता राजकारणाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. काँग्रेसमध्ये त्यांनी निवडणुकीच्या आधी प्रवेश केला. पक्षानेही त्यांना लगेचच उमेदवारी देवू केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world