
Women's Chess World Cup Final: जॉर्जियाची राजधानी बटूमीमध्ये सोमवारी (28 जुलै) इतिहास घडला. नागपूरची 19 वर्षांची दिव्या देशमुख FIDE महिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय बनली. दिव्यानं दुसऱ्या रॅपिड टाय-ब्रेकर गेममध्ये काळ्या मोहरांनी खेळून हम्पीला पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील पहिला रॅपिड टाय-ब्रेकर अनिर्णित राहिला, त्यानंतर दिव्याने दुसऱ्या गेममध्ये विजय मिळवला. या विजयामुळे दिव्याला 'ग्रँडमास्टर' ही पदवी मिळाली असून, तिने कॅंडीडेट्स स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.
दिव्याची पहिली प्रतिक्रिया
या ऐतिहासिक विजेतेपदानंतर दिव्या चांगलीच भारावली होती. ती यावेळी म्हणाली, "मला हे समजून घेण्यासाठी वेळ लागेल. मला वाटते की हे माझ्या नशिबात होते की मला अशा प्रकारे ग्रँडमास्टर (GM) पदवी मिळाली. या स्पर्धेपूर्वी माझ्याकडे एकही नॉर्म नव्हता. याचा माझ्यासाठी खूप अर्थ आहे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे. मला आशा आहे की ही फक्त सुरुवात आहे."
या विजयाचा आनंद साजरा करताना ती तिच्या आईसोबत भावूक झाली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. भारतीय बुद्धिबळ जगतासाठी हा खरोखरच एक अद्भुत क्षण होता.
( नक्की वाचा : Divya Deshmukh : नागपूरकर दिव्या बनली वर्ल्ड चेस चॅम्पियन! 19 व्या वर्षीच रचला इतिहास )
कोण आहे दिव्या देशमुख?
भारतीय बुद्धीबळ विश्वात आजवरही एकाही महिलेला जे जमलं नाही ते दिव्यानं 19 व्या वर्षीच करुन दाखवलं. 'मुलांचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण दिव्याच्या बाबतीत खरी आहे. तिने अगदी लहानपणी बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिनं कधीही मागं वळून पाहिलं नाही.
दिव्या देशमुख हिचा जन्म 2005 साली नागपूरमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळाची खूप आवड होती. पाचव्या वर्षीच तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. आई-वडिलांनी तिचा उत्साह ओळखून तिला योग्य मार्गदर्शन दिलं. देशमुख कुटुंबीय व्यवसायाने डॉक्टर आहे. नागपूरच्या भारतीय विद्या भवन्स सिव्हिल लाईन्स शाळेची विद्यार्थिनी आहे. लहान वयात मोठं यश अगदी लहान वयातच दिव्याने शालेय, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली. या स्पर्धा तिनं जिंकल्या. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेतही ठसा उमटवला. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय टीममध्ये निवड झाली. परदेशातील स्पर्धांमध्येही दिव्याचा धडाका कायम होता.
2025 ठरलं निर्णायक
दिव्यासाठी 2025 हे वर्ष निर्णायक ठरलं. तिच्या कारकीर्दीला या वर्षी कलाटणी मिळाली. दिव्यानं याच वर्षी ऐतिहासिक विजय मिळवला. लंडनमध्ये झालेल्या "World Team Blitz Championship'' स्पर्धेत दिव्याने जगातल्या नंबर 1 महिला खेळाडू – हो यिफान (चीन) हिला हरवलं. या विजयासह दिव्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.
दिव्याच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं कौतुक केलं होतं. यशाची हीच कमान दिव्यानं या स्पर्धेतही कायम ठेवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world