T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. यावेळी निवड समितीनं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. वनडे आणि टेस्टमध्ये टीमचे नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिलला (Shubman Gill) या टीममधून वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गिल नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन होता. त्याला वगळण्यात आल्यानं क्रिकेट फॅन्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
गिलला का वगळलं?
शुबमन गिलच्या T20 टीममधील जागेवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याचा प्रकारातील खराब फॉर्म हे याचे मुख्य कारण आहे. गेल्या 18 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची कामगिरी सुमार ठरली आहे. या 18 मॅचमध्ये त्याला एकही हाफ सेंच्युरी झळकावता आलेली नाही.
2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेली 28 बॉलमध्ये 47 रनची खेळी ही त्याची एकमेव लक्षात राहण्यासारखी खेळी ठरली. टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना त्याला सातत्याने अपयश येत असल्याने शेवटी निवड समितीने कठोर निर्णय घेतला.
( नक्की वाचा : T20 World Cup 2026 : निवड समितीचा मोठा निर्णय, वर्ल्ड कप टीममधून गिलची हकालपट्टी, एक अनपेक्षित एन्ट्री )
सूर्यकुमार यादवने सांगितले कारण
या निर्णयावर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. सूर्या म्हणाला की, गिलला केवळ त्याच्या फॉर्ममुळे नाही तर टीमच्या कॉम्बिनेशनमुळे बाहेर ठेवण्यात आले आहे. टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये एका विकेटकीपर बॅटरची गरज होती, ज्यामुळे गिलची जागा धोक्यात आली. आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या नादात गिलला आपली लय सापडत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
आफ्रिका दौऱ्यातील अपयश आणि दुखापत
सप्टेंबरमध्ये झालेली आशिया कप ही गिलसाठी कमबॅकची मोठी संधी होती, पण तिथेही त्याने निराशाच केली. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये त्याचे प्रदर्शन सरासरीपेक्षाही खाली होते. तीन मॅचमध्ये त्याने केवळ 4, 0 आणि 28 अशी साधारण कामगिरी केली.
लखनौमधील मॅच पावसामुळे रद्द झाली, तर शेवटच्या मॅचमध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. या सर्व गोष्टींचा विचार करता निवड समितीने त्याला वर्ल्ड कप टीममधून वगळण्याचा निर्णय घेतला.
अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी
शुभमन गिलला वगळल्यानंतर आता अक्षर पटेलला टी-20 टीमचा व्हाईस कॅप्टन बनवण्यात आले आहे. भारत आपल्या घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2024 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 2007 नंतर पहिल्यांदा हे जेतेपद पटकावले होते. आता गिलशिवाय मैदानात उतरणारी ही नवीन टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), रिंकू सिंह, जस्प्रीत बुमराह, हार्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंगटन सुंदर आणि इशान किशन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world