
Yashasvi Jaiswal Quits Mumbai : आयपीएल 2025 सुरु असतानाच मुंबई क्रिकेटमधील एका घडामोडीनं सर्वांनाच धक्का बसला. टीम इंडिया आणि मुंबई क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) मुंबई क्रिकेटची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यशस्वी आता गोव्याकडून क्रिकेट खेळणार आहे. यशस्वीच्या जडणघडणीमध्ये मुंबई क्रिकेटचं मोठं योगदान आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज टीम असलेली मुंबई सोडून त्यानं गोव्याकडून खेळण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याबाबतचं खरं कारण उघड झालं आहे.
या प्रकरणात यशस्वी जैस्वालनं सांगितलेलं कारण आणि सूत्रांकडून उघड झालेली माहिती ही वेगवेगळी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यशस्वी काय म्हणाला?
यशस्वी जैस्वालनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, 'हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. आज मी जो काही आहे तो मुंबईमुळे आहे. या शहरानं मला घडवलंय. मी आयुष्यभर एमसीएचा ऋणी आहे.'
त्यानं पुढं सांगितलं की, 'गोव्यानं मला नवी संधी दिली. त्यानं मला नेतृत्त्व करण्याची भूमिका दिली आहे. भारताकडून चांगलं खेळणं हे माझं पहिलं लक्ष्य आहे. मी राष्ट्रीय टीममध्ये नसेल त्यावेळी गोव्याकडून खेळेल. त्यांना स्पर्धेत पुढं नेण्याचा प्रयत्न करेन.'
यशस्वी जैस्वाल हा आगामी सिझनमध्ये गोव्याचा कॅप्टन असेल. तो मुंबईकडून गोव्याच्या क्रिकेट टीममध्ये गेलेला तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांनी गोव्याची वाट धरली होती. यापैकी सिद्धेश पुन्हा मुंबईत परतला आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 : ठुकरा के मेरा प्यार... दुखावलेल्या मोहम्मद सिराजचा RCB ला तडाखा! )
'त्या' मॅचमध्ये ठिणगी पडली?
यशस्वीनं उघडपणे एक कारण सांगितलं असलं तरी त्यानं नाराजीतूनच टीम मॅनेजमेंटवरील नाराजीतूनच मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा सुरु आहे. 'पीटीआय'नं दिलेल्या वृत्तामध्ये हेच संकेट मिळत आहेत.
मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात मागील रणजी सिझनमध्ये झालेल्या मॅचमध्ये ही घटना घडली, असं या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरनं त्या मॅचमध्ये मुंबईचा त्यांच्याच घरच्या मॅचवर पराभव करत खळबळ उडवून दिली होती.
मुंबईच्या सेकंड इनिंगमध्ये वरिष्ठ खेळाडूच्या शॉट सिलेक्शनवर यशस्वीनं नाराजी व्यक्त केली होती. त्यानं सामना वाचवण्यासाठी खेळायला हवं होतं, असं मत यशस्वीनं मांडलं होतं. त्याला उत्तर देताना त्या सिनिअर खेळाडूनं यशस्वीच्या पहिल्या इनिंगमधील शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केला होता, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान गोवा क्रिकेट असोसिएशननं यशस्वीचं स्वागत केलं आहे. 'त्यानं आमच्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्याचं स्वागत करतो. तो पुढील सिझनमध्ये आमच्याकडून खेळेल,' असं गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांभा देसाई यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world