नामिबियामध्ये अत्यंत भयंकर दुष्काळ पडला आहे. गेल्या अनेक दशकात पडला नव्हता असा दुष्काळ इथे पडला आहे. या दुष्काळामुळे कृषी उत्पन्न घटले असून लोकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. या नागरिकांची भूक भागवण्यासाठी राष्ट्रीय उद्यानातील हत्ती, झेब्रा आणि पाणघोड्यांना ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या जनावरांचे मांस नागरिकांना खायला घालण्यात येणार आहे. ज्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये प्राणांची संख्या ही गरजेपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी या प्राण्यांना ठार मारण्यात येणार असल्याचे नामिबियाच्या वनमंत्र्यांनी म्हटले आहे. दुष्काळामुळे झांबियापासून मोझांबिकपर्यंत लाखो नागरीक त्रस्त झाले आहेत.
नामिबियामध्ये मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. दुष्काळामुळे मक्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. लोकांचे एकवेळचे खायचे वांदे झाले असून तिथल्या सरकारने यावर उपाय म्हणून जनावरांचे मांस खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोणत्या जनावरांना ठार मारायचे याची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये हत्ती, म्हशी, चितळ, जंगली रेडे , झेब्रा यांचा समावेश आहे. जनावरांना मारण्याचे काम हे प्रशिक्षित शिकाऱ्यांकडे देण्यात आले असून त्यांनी आतापर्यंत 150 जनावरे ठार मारली आहेत. या जनावरांच्या कत्तलीतून 57 हजार किलो मांस मिळाले आहे. या कत्तीलीचे तिथल्या सरकारने समर्थन केले असून त्यांनी म्हटले आहे की, हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. नामिबियाच्या नागरिकांच्या भल्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे हा अधिकार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नामिबियाने हत्तींची शिकार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हत्तींची संख्या वाढल्याने मानव आणि हत्तींमधील संघर्ष वाढला होता. दुष्काळामुळे पाणी आणि अन्नासाठी हत्ती तसेच इतर जनावरे मानवी वस्त्यांमध्ये घुसायला लागली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world