
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Prakash Ambedkar on Drought: 'राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट तीव्र असतानाही राज्य सरकारने अद्याप तो जाहीर केलेला नाही, यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (बुधवारी) अकोल्यात सरकारवर थेट आणि अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारला "हे चोर सरकार आहे" असे म्हणत घणाघाती टीका केली.
काय म्हणाले आंबेडकर?
आंबेडकर यांनी आरोप केला की, ओला दुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचा स्वार्थ आहे. ते म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर केला तर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते. त्यामुळे खावटीचे वाटप थांबवण्यासाठी आणि टेंडरमधून पैसा खाण्याची संधी कमी होऊ नये म्हणून सरकार जाणीवपूर्वक दुष्काळ जाहीर करत नाही."
दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याच्या सरकारच्या घोषणेवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, "नुकसान भरपाई फक्त दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते."
( नक्की वाचा : Cancer: कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! राज्यात 18 ठिकाणी सरकारी खर्चात उपचार; वाचा, कोणकोणत्या सुविधा मिळणार? )
याचबरोबर, त्यांनी सातबारा कोरा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले. "सत्ताधाऱ्यांचे चरित्र बघा, त्यांनी सातबारा कोरा का केला नाही याचे उत्तर द्यावे," असा सवाल त्यांनी केला. कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागेल आणि त्यामुळे त्यांचा 'मलिदा' कमी होईल, अशी थेट टीका त्यांनी केली.
एका जीआरमध्ये खावटी वाटप आणि दुष्काळ जाहीर करण्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही सरकारने आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मतदारांवरही टीका; सत्ताबदल हाच उद्देश
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्यातील मतदारांवरही टीका केली. "मतदार स्वतःशी प्रामाणिक नाही, तो जात आणि धर्माशी प्रामाणिक आहे. त्यामुळे न्याय मिळणे कठीण झाले आहे. जात-धर्म बघून मतदान करणे थांबवा आणि शहाणे व्हा," असे आवाहन त्यांनी केले.
राजकीय समीकरणांवर भाष्य करताना त्यांनी सत्ताबदल करणे हाच आपला प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले. "भाजपला सोडून आम्ही सर्वांसोबत एकत्र यायला तयार आहोत," असे सांगत त्यांनी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबद्दलची अडचण स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. "मी कोणालाही शुभेच्छा देत नाही,'' असं त्यांनी ठाकरे बंधूंविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world