
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक होत असून मंगळवारी नव्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान होत आहे. ही अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक असून या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरूद्ध डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार आणि सध्याच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांच्यात लढत होत आहे. सुरुवातीला सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, मात्र वय, विसराळूपणा यामुळे त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. 2020 साली बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हाऊस या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करत घुसखोरी केली होती. या घटनेची आठवण करून देत ट्रम्प यांनी 2020 मध्ये व्हाईट हाऊस सोडायला नको होते असे म्हटले होते.
नक्की वाचा : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मुलं किती?
ट्रम्प आणि हॅरीस यांनी अत्यंत त्वेषाने प्रचार केला. यंदाचा प्रचार ट्रम्प यांच्यामुळे विखारी झाल्याची टीका केली जाते. या निवडणुकीत जिंकणार कोण हे सांगणं प्रचंड अवघड झालं आहे. अशातच अमेरिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. निक्सविल नॉच या लहानशा गावात झालेल्या मतदानाचा निकाल स्पष्ट झाला असून, या निकालामुळे कोण जिंकणार? याचं उत्तर आणखीनच गूढ बनले आहे.
1960 सालापासूनची परंपरा कायम
निक्सविल नॉच या गावामध्ये 1960 सालापासून सकाळी लवकर मतदान केलं जातं. रेल्वेमार्ग अंथरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सोयीचे जावे यासाठी सकाळी मतदान ठेवण्यात यायचे. मतदान करून हे कर्मचारी कामावर जाऊ शकत होते. शिवाय इथली लोकसंख्याही अत्यल्प असल्याने इथले निकाल सगळ्यात आधी लागतात.
नक्की वाचा : अमेरिकन निवडणुकीत कसा आला 'समोसा'? प्रत्येकाला तो का हवा आहे?
निवडणूक नियमांनुसार मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात केली जाऊ शकते. या नियमामुळे निक्सविल नॉचमध्ये इतर ठिकाणचे मतदान पूर्ण होण्याची वाट पाहिली जात नाही. मंगळवारी या गावातील मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. या गावामध्ये फक्त 6 मते असून ट्रम्प आणि हॅरीस यांना समसमान मते मिळाली आहेत. 2020 च्या निवडणुकीमध्ये जो बायडेन यांना 5 ट्रम्प यांना 1 मत मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने ही निवडणूक किती चुरशीची आहे याचा अंदाज येऊ शकतो.
सोमवारी प्रचार थांबण्यापूर्वी ट्रम्प आणि हॅरीस दोघांनी मतदारांना आकर्षित करण्याचा अखेरचा प्रयत्न केला. दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी 'आमचा विजय निश्चित आहे' अशी प्रतिक्रिया दिली. या दोघांना पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगनमध्ये प्रचारसभा घेतल्या. हॅरीस यांच्या प्रचारात असंख्य सेलिब्रिटी सहभागी झाले होते, लेडी गागाने हॅरीस यांच्या सभेत गाणंही म्हटलं. ट्रम्प यांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world