जाहिरात

Imran Khan : इम्रान खान जिवंत आहेत की नाही? पाकिस्तानात मोठा गोंधळ, बहिणींचा गंभीर आरोप

Imran Khan Death Rumours: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या अफवांमुळे सध्या पाकिस्तानच्या राजकारणात आणि समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे

Imran Khan : इम्रान खान जिवंत आहेत की नाही? पाकिस्तानात मोठा गोंधळ, बहिणींचा गंभीर आरोप
मुंबई:

Imran Khan Death Rumours:  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या अफवांमुळे सध्या पाकिस्तानच्या राजकारणात आणि समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यांना फाशी देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे, मात्र पाकिस्तानची सत्ताधारी सरकार किंवा सेना यांनी याबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. या अफवांमुळे वातावरण तापलेले असतानाच, आता इम्रान खान यांच्या बहिणींनी केलेल्या एका गंभीर आरोपामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आपल्या भावाला भेटू न दिल्याने त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे, ज्यामुळे रावळपिंडी येथील आदियाला जेल बाहेर मोठा गदारोळ झाला.

बहिणींचा गंभीर आरोप

इम्रान खान यांच्या तीन बहिणी, नूरीन खान, अलीम खान आणि उज्मा खान, यांनी दावा केला आहे की त्यांना गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या भावाला भेटण्याची परवानगी दिली जात नाही. जेत्यांनी इम्रान खान यांना भेटू देण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. एवढंच नाही, तर पोलिसांनी त्यांना मारहाण देखील केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे इम्रान खान यांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रकृतीबद्दलच्या चिंता वाढल्या आहेत.

जेलबाहेर समर्थकांचा मोठा जमाव 

इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या आणि त्यांच्या बहिणींना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी रावळपिंडी येथील आदियाला जेलबाहेर त्यांचे शेकडो समर्थक मोठ्या संख्येने जमले. या जमावाने विद्यमान सरकार आणि प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. इम्रान खान यांच्याबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्याची आणि त्यांच्या भेटीची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी हे समर्थक करत होते. या निदर्शनांमुळे परिसरात तणाव वाढला होता.

( नक्की वाचा : VIDEO : मुस्लीम देशात साकारले 'न्यू वृंदावन'; कोण आहे 'हा' कृष्णभक्त, ज्याने साऱ्या जगाला दाखवली भक्तीची ताकद? )
 

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने दावा केला आहे की, त्यांच्या बहिणी आणि समर्थक शांतपणे जेलबाहेर बसून इम्रान खान यांना भेटण्याची मागणी करत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला. PTI ने या मारहाणीला 'क्रूर आणि पद्धतशीर हल्ला' (Cruel and systematic attack) असे म्हटले असून, आदियाला जेल बाहेर झालेल्या या पोलिसी कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रमुखांना बहिणींचे पत्र

इम्रान खान यांच्या बहिणींनी पंजाब पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पोलिसांची कृती 'क्रूर आणि योजनाबद्ध होती' आणि ती 'कोणत्याही प्रकोपाशिवाय (without provocation) पोलिसांकडून करण्यात आली' असे म्हटले आहे.

नूरीन नियाझी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, "इम्रान खान यांच्या प्रकृतीच्या चिंतेपोटी आम्ही शांततेत विरोध प्रदर्शन करत होतो. आम्ही रस्ते अडवले नाहीत, सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणला नाही किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही. तरीही, कोणत्याही चेतावणीशिवाय परिसरातील स्ट्रीट लाईट्स अचानक बंद करण्यात आल्या आणि जाणूनबुजून अंधार करण्यात आला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी हा क्रूर आणि योजनाबद्ध हल्ला केला."

( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
 

'71 व्या वर्षी मला केस पकडून फरफटले'

नूरीन नियाझी यांनी आपल्या पत्रात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केले आहे. त्या म्हणतात, "71 वर्षांच्या वयात माझे केस पकडून मला हिंसकपणे जमिनीवर पाडण्यात आले आणि रस्त्यावर फरफटले गेले, ज्यामुळे मला जखमा झाल्या."

त्यांनी पुढे सांगितले की, जेलबाहेर उपस्थित असलेल्या इतर महिलांनाही थप्पड मारण्यात आले आणि त्यांना फरफटण्यात आले. पोलिसांचे हे वर्तन लोकशाही समाजात कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेच्या मूलभूत कर्तव्यांशी पूर्णपणे विसंगत आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांच्या बहिणींनी या क्रूर हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com