
Nimisha Priya: यमनमध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याच्या अगदी जवळ असलेल्या भारतीय वंशाच्या नर्स निमिषा प्रिया हिला पुन्हा एकदा जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निमिषाला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार होती. पण, ताज्या माहितीनुसार 16 जुलै रोजी तिची होणारी फाशी तात्पुरती टळली आहे. सुन्नी मुस्लिम नेते कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी घेतलेला पुढाकार तसंच भारत सरकारतकडून सुरु असलेले प्रयत्न यामुळे निमिषाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी फाशी थांबवण्यासाठी सूफी विद्वानांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू होते. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख विद्वान आणि सूफी नेते शेख हबीब उमर बिन हाफिज यांचे प्रतिनिधी आणि यमनी नागरिक तलाल अब्दो महदी यांच्या कुटुंबात मंगळवारी धमार येथे एक बैठक होणार होती.
हा प्रयत्न केवळ निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा नसून, दोन देश आणि दोन संस्कृतींमध्ये एक मानवतावादी पूल बांधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.
काय आहे प्रकरण?
निमिषा प्रियावर तिचा यमनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे. यमनमध्ये 2017 साली महदीचा मृत्यू झाला. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनंतर 2020 मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी रद्द करण्याचे तिचे शेवटचे अपील 2023 मध्ये फेटाळण्यात आले होते., केरळमधील पालक्काड येथील ही नर्स सध्या यमनची राजधानी सना येथील तुरुंगात बंद आहे. तिचे कुटुंब प्रत्येक क्षणी तिच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहे.
( नक्की वाचा : Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, यमनमध्ये कशी अडकली? )
मुसलियार यांचा हस्तक्षेप
भारत सरकारनेही आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु यमनमधील गुंतागुंतीच्या आणि अस्थिर परिस्थितीमुळे जास्त काही करणे कठीण वाटत होते. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात 'सर्वतोपरी प्रयत्न' करत आहेत, असे सांगितले होते.
त्याचवेळी 94 वर्षांचे सूफी विद्वान कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराने, आणखी एक प्रमुख सूफी नेते, शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्या प्रतिनिधींनी महदीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. ही मोठी घटना मानली जात आहे. कारण कारण तलालची हत्या केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही, तर धमार भागातील आदिवासी आणि रहिवाशांसाठीही एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक मुद्दा होता आणि आतापर्यंत कोणीही कुटुंबाशी थेट बोलू शकले नव्हते. मुसलियार यांच्या आध्यात्मिक प्रभावामुळेच हे पहिल्यांदा शक्य झाले.
( नक्की वाचा : Shubhanshu Shukla : वेलकम बॅक शुभांशू! Axiom-4 यान पृथ्वीवर परतले, वाचा काय आहेत मोहिमेची वैशिष्ट्ये )
निर्णायक बैठक आणि शेवटची आशा
मंगळवारी यमनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता, धमार येथे महदीच्या कुटुंबात आणि शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्या प्रतिनिधींमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. सूत्रांनुसार, तलालचा एक जवळचा नातेवाईक, जो हुदैदा स्टेट कोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि यमनच्या शूरा कौन्सिलचा सदस्य देखील आहे, या बैठकीत सहभागी झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो शेख हबीब उमरच्या सूफी संप्रदायाचा अनुयायी आहे, ज्यामुळे कुटुंबाला समजावण्याची आशा वाढली आहे.
या बैठकीचा मुख्य उद्देश नुकसानभरपाई स्वीकारण्याबाबत अंतिम निर्णय घेणे हा होता. दुसरीकडे, मुसलियार यांनी यमनच्या अधिकाऱ्यांकडून 16 जुलै रोजी होणारी फाशी तात्पुरती स्थगित करण्याची विनंती देखील केली होती. या प्रयत्नांमुळे निमिषा आणि तिच्या कुटुंबाच्या आशा वाढल्या आहेत.
भारत सरकारच्या प्रयत्नांचाही परिणाम
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकार या प्रकरणात सुरुवातीपासूनच सर्वतोपरी मदत करत होती. अलीकडच्या काळात, भारत सरकारने निमिषा प्रियाच्या कुटुंबाला दुसऱ्या पक्षाशी (मृतकाच्या कुटुंबाशी) कोणतीही परस्पर सहमती असलेली तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या प्रकरणाची संवेदनशीलता असूनही, भारतीय अधिकारी स्थानिक तुरुंग अधिकारी आणि अभियोजक कार्यालयाच्या सतत संपर्कात होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world