भारत आणि अमेरिकेमधील शुल्क वादाचा (tariff tension) मुद्दा चांगलाच तापला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 27 ऑगस्टपासून 25 टक्के अतिरिक्त शुल्क (आता एकूण 50 टक्के) लावले आहेत. भारतानंही या विषयावर देशहितावर कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका घेतलीय. त्याचवेळी एका जर्मन वृत्तपत्राने दावा केला आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केले, पण पंतप्रधान मोदींनी त्यांचे उत्तर दिले नाही.
भारत-अमेरिका शुल्क वादाचे विश्लेषण करणाऱ्या फ्रँकफर्टर ऑलगेमाइन जिटुंग (F.A.Z.) च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, व्यापार युद्धात तक्रारी, धमक्या आणि दबाव टाकण्याचे डावपेच वापरणे ही ट्रम्प यांची नेहमीची रणनीती आहे. इतर अनेक देशांच्या बाबतीत ही रणनीती यशस्वी ठरते, पण भारतावर त्याचा परिणाम झालेला नाही.
( नक्की वाचा : Trump Tariff : भारतावर 50% टॅरिफ लागू; देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? वाचा तज्ज्ञांचा इशारा )
जर्मन वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये काय दावा?
एफ.ए.झेड. ने दावा केला की, अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये ट्रम्प यांनी चार वेळा फोन करूनही पंतप्रधान मोदींनी उत्तर देण्यास नकार दिला. मात्र, रिपोर्टमध्ये कथित कॉल्स कोणत्या तारखांना करण्यात आले होते, ते स्पष्ट करण्यात आले आहे.
जर्मन वृत्तपत्राने रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की, यापूर्वी ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% निर्यात शुल्क लावून आणि भारताला "मृत अर्थव्यवस्था" (dead economy) म्हणून हिणवून नवी दिल्लीला नाराज केले होते. एफ.ए.झेड. नुसार, ट्रम्प यांच्या या कृतींमुळे मोदी नाराज झाले असावेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "भारतीय (मोदी) अजूनही बोलण्यास नकार देत आहेत, हे त्यांच्या रागाची तीव्रता दर्शवते, पण त्यांची सावधगिरी देखील यामधून स्पष्ट होत आहे."
( नक्की वाचा : Trump Tariff : टॅरिफ वॉरचा फटका! भारत सरकारचा मोठा निर्णय; अमेरिका पोस्ट सेवा बंद, वाचा नवे नियम )
मोदींनी का उचलला नाही फोन?
एफ.ए.झेड. ने सावधगिरी बाळगण्यामागे कारणही सांगितले आहे. वास्तविक, ट्रम्प यांनी व्हिएतनामच्या फर्स्ट सेक्रेटरी टू लॅम यांच्याशी फोनवर बोलताना अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातील एका व्यापार करारावर पुन्हा चर्चा केली होती, जो शिष्टमंडळांनी खूप कष्ट घेऊन आयोजित केला होता. पण कोणत्याही करारावर पोहोचण्याआधीच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की एक व्यापार करार झाला आहे. एफ.ए.झेड. ने दावा केला आहे, "मोदींना त्याच जाळ्यात अडकायचे नाही."
वृत्तपत्राने असेही लिहिले आहे की, अमेरिकेच्या कृषी व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठा खुल्या करण्याच्या ट्रम्प यांच्या दबावापुढे पंतप्रधान मोदी ठाम आहेत. याव्यतिरिक्त, रशियन तेल खरेदी करण्याचा भारताचा निर्णय आणि त्या बदल्यात ट्रंप यांनी लावलेले 25 टक्के अतिरिक्त शुल्क यामुळे संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत.