अनेकदा ऑफिसमधील चांगल्या परफॉमन्ससाठी कर्मचारी भूक-तहान विसरून काम करीत असतात. अनेकदा ते स्वत:च्या आरोग्याचाही विचार करीत नाही. अशातच चीनमधील एका ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा अतितणावातून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा तरुण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा त्याला ऑफिसच्या ग्रुपमध्ये अॅड करून कामाबद्दल विचारणा केली जात होती.
चीनच्या सॉफ्टवेअर इंजिनियरसोबत नेमकं काय घडलं?
३२ वर्षांच्या या तरुणाने स्वत:ला कामात वाहून घेतलं होतं. तो अनेकदा ओव्हरटाइम करीत होता. सुट्टीच्या दिवशीही काम करायचा. त्याने अनेकदा आपल्या कुटुंबीयांना याबाबत तक्रार केली होती. सततच्या कामाच्या दबावामुळे त्याची प्रकृती खालावली होती. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सिना न्यूजमधील एका वृत्तानुसार, गाओ गुआंगहुई हा ३२ वर्षीय तरुण वर्क फ्रॉम होम करीत असताना त्याच्या घरी बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवलं. मात्र त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
व्हेंटिलेटरवर असताना मॅनेजरला मेसेज
तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे, तो व्हेंटिलेटरवर असताना त्याच्या मॅनेजरचे कामासाठी मॅसेज आले, त्याला कामाच्या एका नव्या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आलं, असा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या वर्क कल्चरवर संताप व्यक्त केला जात आहे. "एखादा माणूस मरत असतानाही कंपनीला फक्त कामाची पडली आहे का?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
चीनमधील अनेक कंपन्यांमध्ये ९९६ अशी कामाची पद्धत आहे. सकाळी ९ ते रात्री ९ आणि आठवड्याचे ६ दिवस अशी पद्धत आहे. या पद्धतीमुळे अनेक तरुणांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. तर काहींना आपला जीवही गमवावा लागत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
