राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रिम कोर्टाने सुप्रिम दणका दिला आहे. ट्रम्प यांचा बर्थराईट सिटीझनशिप कायदा कोर्टाने रद्द ठरवला आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा झटका समजला जात आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्यात जन्मजात नागरिकत्वाचा (Birthright Citizenship) अधिकार कायम ठेवला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीचा वादग्रस्त एक्झिक्युटिव्ह ऑर्डर (कार्यकारी आदेश) न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या आदेशाद्वारे जन्माच्या आधारे मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाच कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मंगळवारी कोर्टात यावर सुनावणी झाली. त्यात 6-3 अशा बहुमताने हा निर्णय सुनावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले होते की, अमेरिकेत बेकायदेशीर किंवा तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या पालकांच्या मुलांना जन्माच्या आधारे नागरिकत्व दिले जाऊ नये. मात्र, सुप्रीम कोर्टाने हा आदेश फेटाळत स्पष्ट केले की, अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला अमेरिकन नागरिकत्वाचा कायदेशीर अधिकार आहे.
'बर्थराईट सिटीझनशिप' हा अमेरिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर अधिकार आहे. अमेरिकन संविधानाच्या 14 व्या दुरुस्तीनुसार (14th Amendment) हा अधिकार मिळाला आहे. यानुसार, एखादं मूल जर अमेरिकेच्या धरतीवर जन्माला आले, तर त्याला आपोआपच तिथले नागरिकत्व मिळते. यामध्ये त्याचे आई-वडील अमेरिकन नागरिक आहेत की नाही, याचा त्यावर काही फरक पडत नाही. त्याचा जन्म जर अमेरिकेत झाला तर त्याला तिथले नागरिकत्व मिळते हा कायदा आहे. 1868 मध्ये सर्वांना समान नागरिक हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला होता.
30 जून 2026 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ट्रम्प यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकाला नागरिकत्वाचा समान हक्क अबाधित पाहील, असे कोर्टाने सांगितले. 9 न्यायाधीशांच्या खंडपीठात 6 जणांना यासाठी आग्रह धरला. या निर्णया मुळे जगभरातून अमेरिकेत जाणाऱ्या तात्पुरत्या नागरिकांना आणि स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय ही आहेत. त्यांना तिथे मुलंही होतात. त्यानंतर ते अमेरिकेचे नागरिकत्व ही घेतात. अशा पद्धतीने अनेक भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world