उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या जगभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार एका अशा प्रस्तावावर विचार करत आहे, ज्याअंतर्गत तेथील विद्यापीठांमधून पदवी पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत नोकरी मिळवण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना 1 लाख अमेरिकन डॉलर (सुमारे 96 लाख भारतीय रुपये) फी भरावी लागू शकते. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मधील एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या बातमीनंतर जगभरातील तज्ज्ञ आणि शिक्षण संस्थांनी ट्रम्प प्रशासनाच्या या विचारावर तीव्र टीका केली आहे.
कशी वसूल केली जाणार फी?
अहवालानुसार, ट्रम्प सरकार ही 1 लाख डॉलरची फी 'ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग' या योजनेशी जोडण्याचा विचार करत आहे.
(नक्की वाचा- Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)
OPT म्हणजे काय?
या व्यवस्थेनुसार, अमेरिकेत पदवी पूर्ण करणारे परदेशी विद्यार्थी आपल्या शिक्षण क्षेत्रात 1 ते 3 वर्षांपर्यंत अमेरिकेत प्रत्यक्ष काम करू शकतात. तंत्रज्ञान (IT) आणि वित्त (Finance) क्षेत्रातील मोठ्या अमेरिकन कंपन्या परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना आधी OPT अंतर्गत नोकरीवर ठेवतात आणि त्यानंतर त्यांच्यासाठी H-1B व्हिसा स्पॉन्सर करतात. 2024 च्या आकडेवारीनुसार, सुमारे 4 लाख 19 हजार परदेशी विद्यार्थी OPT द्वारे अमेरिकेत काम करत होते. जर हा नियम लागू झाला, तर अमेरिकन विद्यापीठांनाही मोठा आर्थिक फटका बसेल, कारण परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावर विद्यापीठांचे मोठे उत्पन्न अवलंबून असते.
H-1B व्हिसावरील शुल्काच्या प्रयत्नाला आधीच बसलाय झटका
OPT वर शुल्क लादण्याची ही चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे, जेव्हा ट्रम्प सरकारला H-1B व्हिसाशी संबंधित एका प्रकरणात अमेरिकन न्यायालयात मोठा झटका बसला आहे. यापूर्वी ट्रम्प सरकार H-1B व्हिसा अर्जदारांवरही १ लाख डॉलरचे शुल्क लावू इच्छित होते. मात्र, बोस्टनच्या फेडरल अपील कोर्टाने या निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. टेक कंपन्यांच्या तीव्र विरोधामुळे सरकारला मागे राहावे लागले होते. मात्र, आता OPT वर शुल्क लागू केल्यास त्याचा थेट फटका आधीच अमेरिकेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बसेल.
(नक्की वाचा- Rain News: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्याना 'रेड अलर्ट'; दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर)
भारतीय विद्यार्थ्यांवर सर्वाधिक परिणाम का?
सध्या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी जवळपास एक-तृतीयांश म्हणजेच सुमारे 3 लाख 30 हजार विद्यार्थी भारतीय आहेत. बहुतांश भारतीय विद्यार्थी बँकांकडून लाखो रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेऊन अमेरिकेत जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर OPT द्वारे मिळणाऱ्या नोकरीतून ते हे कर्ज फेडतात. जर ट्रम्प सरकारने 1 लाख डॉलर फी वसूल करण्याचा निर्णय अधिकृतपणे लागू केला, तर भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world