शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं आहे. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस यांनी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. युनूस यांच्यासह 17 जणांनी शपथ घेतली. ज्यामध्ये दोन 26 वर्षीय विद्यार्थी नेत्यांचाही समावेश आहे. ज्यांची सध्या संपूर्ण देशभर चर्चा आहे.
एम नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद साजिब भुईया ही अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. दोघांनीही विद्यार्थी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. बांगलादेशातील शेख हसीना यांच्या सत्तेला सुरुंग लावणारे हे प्रमुख चेहरे मानले जातात. दोघेही आता नव्या सरकारचा भाग आहेत.
कोण आहे नाहिद इस्लाम?
बांगलादेशात सुरु असलेल्या आरक्षणाविरोधी आंदोलनाचा नाहिद इस्लाम हा प्रमुख चेहरा आहे. नाहिद हा बांगलादेशातील विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे. याच आंदोलनामुळे शेख हसीना यांना दीड दशकांच्या सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं आणि देशही सोडावा लागला. विद्यार्थी नेता नाहिदमुळेच हे आंदोलन इतके हिंसक झाले, असं बोललं जातं. मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्यामध्ये देखील नाहिदची महत्वाची भूमिका आहे.
(नक्की वाचा- शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?)
26 वर्षीय नाहिदने ढाका विद्यापीठात 2016-17 मध्ये समाजशात्र विषयात पदवी घेतली. तो मानवाधिकार कार्यकर्ता आणि विद्यार्थी संघटना 'स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन'चा समन्वयक देखील आहे. नाहिदचे वडील शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे.
आरक्षण कोटाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर विद्यार्थी आंदोलन थंड झालं होतं. मात्र नाहिदने पुन्हा हे आंदोलन जीवंत केलं आणि त्यानंतर हिंसाचार भडकला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप देखील त्याने केला होता. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, सहकाऱ्यांना अटक केले असे अनेक आरोप नाहिदने पोलिसांवर केले होते. मात्र पोलिसांनी हे सारे आरोप फेटाळले होते.
कोण आहे आसिफ महसूद?
बांगलादेशातील हंगामी सरकारमध्ये सामील आसिफ महसूद विद्यार्थी आंदोलनाचा दुसरा मोठा चेहरा होता. आसिफ भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख समन्वयक होता. आसिफ ढाका विद्यापीठात 2017-18 या वर्षात भाषा अभ्यासाचा विद्यार्थी होता. जून 2024 मध्ये तो विद्यार्थी आंदोलनात जोडला गेला.
(नक्की वाचा- Exclusive: बांगलादेशमधील बदलाचं खरं कारण काय? सत्ता स्थापनेस तयार नोबेल विजेत्यानं सांगितलं....)
बांगलादेशातील डिटेक्टिव्ह ब्रान्चने आसिफला 26 जुलै रोजी ताब्यात घेतलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव आसिफला उपचारादरम्यान रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर 1 ऑगस्ट रोजी त्याची सुटका करण्यात आली. आंदोलनादरम्यान आसिफला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं देखील बोललं जात आहे. एका इंजेक्शनमुळे आसिफ अनेक दिवस बेशुद्ध होता. आसिफच्या कुटुंबियांनी त्याच्या भेटीसाठी विनंती केली होती, ती देखील फेटाळण्यात आली होती.
अशारितीने नाहिद आणि आसिफ या दोघांनी मोठा धोका पत्करत आरक्षण विरोधी आंदोलनाचं एकप्रकारे नेतृत्व केलं. या आंदोलनात त्यांच्या जीवाला देखील धोका होता. मात्र कशाचीही पर्वा न करता त्यांनी स्वत:ला आंदोलनात झोकून देत शेख हसीना यांच्या सरकारला थेट आव्हान दिलं. याचचं बक्षिस म्हणून बांगलादेशातील हंगामी सरकारमध्ये त्यांना जागा मिळाली आहे. बांगलादेशातील राजकारणातील आसिफ आणि नाहिद यांचा प्रवास असेल हे देखील पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world