जाहिरात
Story ProgressBack
13 days ago
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं.  देशभरातील 102 आणि महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान पार पडताना देशातील काही भागात हिंसेच्या घटना घडल्या. दुपारपर्यंत नागालँडमधील सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान झालं. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी या जिल्ह्यातील नागरिकांनी निषेध नोंदवत मतदान करण्याचे नाकारले. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघात शांततेत मतदान पूर्ण झालं. 

निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान पार पडलं. याशिवाय त्रिपूरात एका मतदारसंघात सर्वाधिक 79.90 टक्के मतदान, त्यानंतर पश्चिम बंगालमधील तीन मतदारसंघात 77.57 टक्के मतदान पार पडलं. आज तामिळनाडूमधील सर्व 39 मतदारसंघ, राजस्थानातील 25 पैकी 12 आणि उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8 मतदारसंघात मतदान झालं. 

Latest and Breaking News on NDTV

महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जात असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत आहे. आजच्या पहिला टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 18 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 1 लाख 84 हजार मतदान केंद्रांचा समावेश होता. मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला आणि 11 हजार 371 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं.

Apr 19, 2024 20:22 (IST)
महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान
निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान पार पडलं. याशिवाय त्रिपूरात सर्वाधिक 79.90 टक्के मतदान, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के मतदान पार पडलं. आज तामिळनाडूमधील सर्व 39 मतदारसंघ, राजस्थानातील 25 पैकी 12 आणि उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8 मतदारसंघात मतदान झालं. 
Apr 19, 2024 18:01 (IST)
नागपूर विभागातील 5 मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी
भंडारा गोंदिया :  56.87 %
चंद्रपूर : 55.11 %
गडचिरोली-चिमूर : 64.95 %
नागपूर : 47.91 %
रामटेक : 52.38 %
Advertisement
Apr 19, 2024 16:42 (IST)
अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथे 73 टक्के मतदान
मध्यप्रदेश, छतिसगड, महाराष्ट्र  सीमेवर मुरकुटडोह हे गाव आहे. इथे तब्बल 73 टक्के मतदान झाले आहे. या मतदान केंद्रावर जवळपासच्या पाच गावांनी मतदान केले आहे. 658 मतदार पैकी 482 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा गोंदीया लोकसभेसाठी त्यांनी मतदान केले.  
Apr 19, 2024 16:06 (IST)
नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत सरासरी 44.12 मतदान
3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 
   
रामटेक लोकसभा         40. 10 टक्के 
नागपूर लोकसभा          38.43  टक्के 
भंडारा लोकसभा           45.88  टक्के 
गडचिरोली लोकसभा     55.79 टक्के 
चंद्रपूर लोकसभा            43.48 टक्के 
Advertisement
Apr 19, 2024 15:03 (IST)
आधी मतदान मग लग्न
प्रणय अशोक येनुरकर या तरूणाचे आज लग्न होते. डोक्यावर अक्षदा पडण्या आधी त्याने मतदान करण्याला प्राधान्य दिले. त्याच्या वऱ्हाडातील मंडळीनीही मग मतदानाचा अधिकार नोंदवला. दसरा रोड महाल नागपूर इथं या सर्वांना मतदान केलं. 

Apr 19, 2024 13:56 (IST)
दुपारी १ वाजेपर्यंत गडचिरोलीत 41.01 टक्के तर नागपूरात 28.75 टक्के मतदान
दुपारी एक वाजे पर्यंत विदर्भातल्या पाच लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यात सर्वाधिक मतदान हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात झाली आहे. गडचिरोलीत एक वाजेपर्यंत 41.01 टक्के झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे रामटेक मतदार संघात 28.73 टक्के झाले आहे. 

भंडारा गोंदिया :  34.56 %
चंद्रपूर :              30.96 %
गडचिरोली :       41.01 %
नागपूर :             28.75 %
रामटेक :            28.73 %

Advertisement
Apr 19, 2024 13:49 (IST)
चंद्रपूरात मतदानावर परिणाम
उन्हाचा कडाका आणि मतदान याद्यांमधील अनियमितता यामुळे मतदारांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचाही परिणाम मतदानावर झालाय.

Apr 19, 2024 13:45 (IST)
माजी मंत्री परिणय फुके यांनी लाखनीत केले मतदान
भाजपचे नेते आणि माजी मंत्री परिणय फुके यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 
Apr 19, 2024 13:45 (IST)
माजी मंत्री परिणय फुके यांनी लाखनीत केले मतदान
भाजपचे नेते आणि माजी मंत्री परिणय फुके यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 
Apr 19, 2024 12:04 (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा तालुक्यात तीन ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड
गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगाना राज्यालगत असलेला सिरोंचा तालुक्यात मतदान होत आहे. मात्र बूथ मधील ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने अहेरीवरून तीन नवीन मशीन रवाना करण्यात आले. गडचिरोली पोलिस हे ईव्हीएम अहेरीहून हेलिकॉप्टरने घेवून सिरोंचाकडे रवाना झाले आहेत.  
Apr 19, 2024 11:55 (IST)
नागपूरसह 5 मतदार संघात 11 वाजेपर्यंत सरासरी 19 टक्के मतदान
सकाळा अकरावाजे पर्यंत नागपूरसह पाच लोकसभा मतदार संघात सरासरी 19 टक्के मतदान झाले आहे. त्यात सर्वाधिक मतदान हे गडचिरोली लोकसभा मतदार संघात झाले आहे. अकरा वाजेपर्यंत गडचिरोलीत 24.88  टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर भंडाऱ्यात 19.72,  चंद्रपूर  18.94, नागपूर  17.53 आणि रामटेक 16.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 



 
Apr 19, 2024 11:34 (IST)
पूर्व विदर्भातील पाचही जागा जिंकणार - पटोले
पूर्व विदर्भात पहिल्या टप्यात आज पाच जागासाठी मतदान होत आहे. या पाच ही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.  तर भाजपाच्या दोन नेत्यांचा दारून पराभव होणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान पटोले यांनी आपल्या सुकळी गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदान केले. 
Apr 19, 2024 11:31 (IST)
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नागपूरात मतदान केले
बनवारीलाल पुरोहीत यांनी पंजाबमधून येवून नागपूरात मतदान केले आहे. पुरोहीत हे याआधी नागपूरचे खासदार राहिलेले आहेत. त्यांनी मतदारांना उष्णता जास्त असली तरी मतदानाला बाहेर पडा असं आवाहन केले आहे. मी पंजाब मधून मतदानासाठी आलो तुम्ही घरातून बाहेर पडा, मतदान करा असं ते म्हणाले आहेत. 
Apr 19, 2024 10:51 (IST)
गडचिरोलीत नव मतदारांची रथात बसवून मिरवणूक काढण्यात आली
गडचिरोलीत निवडणूक आयोगाने अभिनव उपक्रम राबवला आहे. जे नवमतदार आहेत त्यांची रथात बसून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  बँडबाजासह ही मिरवणूक मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आली. 
Apr 19, 2024 10:48 (IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बजावला मतदानाच हक्क
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांनी नागपूरात केले मतदान.  सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदारन करावं असं आवाहन त्यांनी यानिमित्ताने केलं. 
Apr 19, 2024 10:44 (IST)
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनीही मतदान करत आपला हक्क बजावला
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित  मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
Apr 19, 2024 10:33 (IST)
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी केलं मतदान
विरोधीपक्ष नेते  विजय वडेट्टीवार यांनी पत्नी किरण, मुलगी  शिवानीसह मतदानाचा हक्क बजावला. वडेट्टीवार यांच्यावर गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 
Apr 19, 2024 10:22 (IST)
नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा अधिकार
नितीन गडकरी यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यांनी  परिवारातील सर्व सदस्यांसह नागपूरच्या टाऊन हॉल परिसरात मतदान केले. नागपूर लोकसभा मतदार संघात नितीन गडकरींची लढत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्या बरोबर होत आहे. दरम्यान सकाळी नऊ वाजेपर्यंत नागपूर लोकसभेत धिम्या गतीने मतदान सुरू आहे.  
Apr 19, 2024 10:17 (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रफुल्ल पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या बरोबर पत्नी आणि तिन मुलं होती. त्यांनीही मतदान केले. मतदानानंतर पटेल यांनी देशात मोदींची हवा असल्याचे सांगितले. शिवाय मोदीं विरोधातला चेहरा कोण आहे असा प्रश्न ही केला. देश युवकांचा आहे, त्यामुळे देश कोणाच्या हातात द्यायचा याचा ते नक्कीच विचार करतील. अशी प्रतिक्रीया त्यांनी मतदानानंतर दिली. 
Apr 19, 2024 10:12 (IST)
बोहल्यावर चढण्या आधी नवरदेव पोहचला मतदान केंद्रावर
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खुशारी येथील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्या आधी मतदान केंद्र गाठलं. मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर तो लग्न मंडपात गेला. श्रीहरी रमेश गायधने असे नवरदेवाचे नाव आहे.  

Apr 19, 2024 09:54 (IST)
पहिल्या दोन तासात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत
गडचिरोली लोकसभेसाठी सकाळी सात वाजता मदतानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दोन तासात म्हणजेच 9 वाजे पर्यंत इथे  जवळपास 12.8 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नागपूर, रामटेक,चंद्रपूर, भंडाऱ्याच्या तुलनेत गडचिरोलीत जास्त मतदान झाले आहे. 
Apr 19, 2024 09:52 (IST)
सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7 टक्के मतदान
सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग हा थोडा कमी दिसून आला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी 7 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यात नागपूर लोकसभेत 8 टक्के, रामटेक 6 टक्के,भंडारा गोंदिया 7.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे. 
Apr 19, 2024 09:00 (IST)
भंडाऱ्यात काँग्रेसह भाजप उमेदवारांनी केले मतदान
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांनी भंडारा शहारातील जिजामाता शाळेत सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला आहे. देशात तानाशहा सरकार असुन या सरकारला जनता उखडून फेकेल अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली. तर भाजप उमेदवार  सुनील मेंढे यांनीही सहपत्नीक महाराष्ट्र नूतन शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचे पर्व आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी घरातून निघून आपला मतदानाचा हक्क पूर्ण करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

Apr 19, 2024 08:57 (IST)
समाजसेवक विकास आमटे यांनी ही आनंदवनात केलं मतदान
चंद्रपूरात मतदानाला सकाळी 7 वाजतापासून सुरवात झाली आहे. सकाळ पासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरवात केली आहे. मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. सकाळीच शिक्षक आमदार सुधाकर आडबाले पत्नीसह मतदान केंद्रात येवून मतदान केलं. काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.  वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी ही मतदान केलं. समाजसेवक विकास आमटे यांनी ही आनंदवनात मतदान केलं. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत.
Apr 19, 2024 08:54 (IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
कोराडी येथे ग्रामपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी रांगेत उभे राहून मतदानासाठी  प्रतीक्षा केली. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी.माध्यमांशी संवाद साधला.
Apr 19, 2024 08:49 (IST)
गडचिरोलीत मतदानासाठी मतदान केंद्रा बाहेर रांगा
गडचिरोली येथे आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा येथे बुथ क्रमांक 118 वर सकाळी सात वाजताच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. नागरिकांकडून उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविण्यात येत आहे.
Apr 19, 2024 08:40 (IST)
चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा अधिकार
चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  प्रतिभा धानोरकरांची लढत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या बरोबर होत आहे. 
Apr 19, 2024 08:34 (IST)
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  तिथे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या कक्षाची सकाळी पाहणी केली.




Apr 19, 2024 08:27 (IST)
महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी उमरेड येथे केले मतदान
रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी उमरेड इथे मतदानाचा हक्क बजावला.  त्या आधी त्यांचे घरी औक्षण करण्यात आले. 
Apr 19, 2024 08:22 (IST)
नितीन गडकरींनीही केले मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा भव्य उत्सव. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान  होत आहे. नागपूरच्या प्रगतीसाठी मी नागपूरच्या जनतेला 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन करतो. देशासाठी आपले मत महत्वाचे आहे! असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. 


Apr 19, 2024 08:20 (IST)
राहुल गांधींनीही केले मतदान करण्याचे आवाहन
राहुल गांधी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय गेल्या दहा वर्षात झालेल्या अन्यायाच्या जखमांना मतदानाचे मलम लावा असे ही म्हटले आहे. 


Apr 19, 2024 08:16 (IST)
'मी एक लाख मतांनी जिंकणार' विकास ठाकरेंचा दावा
नागपूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर आपण एक लाखाच्या मतांनी विजयी होवू. मी जायंट किलर ठरणार आहे असा दावा केला आहे. 
Apr 19, 2024 08:08 (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. देशातील 102 मतदार संघात आज मतदार होत आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदार संघाचा यात समावेश आहे. 

Apr 19, 2024 08:00 (IST)
काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे मतदान केंद्रावर पोहोचले
नागपूर लोकसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. ठाकरे यांचा समाना भाजपचे नेते नितीन गडकरीं बरोबर होत आहे. 
Apr 19, 2024 07:55 (IST)
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला
राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी सर्वांना मतदान करावे असं आवाहन केलं. मतदान हा आपला हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   


डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination