सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Municipal Corporation Election 2026 : लोकशाहीचा उत्सव सर्वसमावेशक असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून वारंवार केला जातो. मात्र,पिंपरी-चिंचवडमध्ये या दाव्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. बॅलेट मशीन आणि मतपत्रिकेवर ब्रेल लिपीत माहिती उपलब्ध नसल्याने पसंतीचा उमेदवार निवडणे अंध बांधवांसाठी अशक्य झालं आहे.या संतापजनक प्रकारामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग तरुण-तरुणींनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. "बॅलेट मशीन आणि मतपत्रिकेवर ब्रेल लिपी मध्ये मतदान प्रक्रियेची माहिती उपलब्ध नसल्याने आम्हाला मतदान करता येत नाही, असं म्हणत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात काही दिव्यांग तरुण तरुणी दाखल झाले आहेत.
'ही' सुविधा न दिल्याने उमेदवाराची ओळख पटवणे कठीण
मतदानाच्या वेळी अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते.ज्यावर उमेदवाराचा अनुक्रमांक,नाव आणि चिन्ह याची माहिती असते.मात्र यंदा ही सुविधा न दिल्याने उमेदवाराची ओळख पटवणे कठीण झाले आहे.'आम्हाला रंग दिसत नाहीत,त्यामुळे रंगीत मतपत्रिकेचा उपयोग काय?'असा सवाल या आंदोलकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे,मतदान केंद्रावरील अधिकारी अंध मतदारांना 'सहाय्यक'घेण्याचा सल्ला देत आहेत. मात्र,सहाय्यक घेतल्यास आम्ही कोणाला मतदान केले हे त्याला समजते,यामुळे आमच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होतो, अशी भूमिका अंध बांधवांनी मांडली आहे.
नक्की वाचा >> "मतदारांनी बोटावरील शाई काढण्याचा प्रयत्न करू नये, शाई काढल्यास..", राज्य निवडणूक आयुक्तांनी दिला मोठा इशारा
अ, ब, क, ड' लिहिल्याने नक्की कोणाला मत द्यावे?
दिव्यांग हक्क कायद्यानुसार,प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने आणि स्वतंत्रपणे मतदान करण्याचा अधिकार आहे.मात्र,ब्रेल लिपीची सोय न करून आयोगाने या कायद्याचे थेट उल्लंघन केल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे.मशीनवर केवळ 'अ, ब, क, ड' असे लिहिल्याने नक्की कोणाला मत द्यावे,असा संभ्रम निर्माण झाला आहे.आम्हाला दर निवडणुकीत ब्रेल लिपीची मतपत्रिका मिळते,मग यंदाच ती का गायब झाली ?प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आमच्या लोकशाही हक्कावर गदा आणणारा आहे. असा सवाल ही दिव्यांग बांधवांनी विचारला आहे.या प्रकरणावर आता निवडणूक निर्णय अधिकारी काय पावले उचलतात आणि या वंचित मतदारांना त्यांचा हक्क बजावता येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Voter Ink : मतदानाच्या वेळी Index Finger वरच का लावली जाते शाई? मतदाराला दोन हात नसल्यास मतदान करता येतं का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world