जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेतील 16 नगरसेवकांचे पद धोक्यात, राजकीय समीकरणे बदलणार?

Chhatrapati Sambhajinagar POlitical News: महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व तक्रारींची कायदेशीर व तथ्यात्मक छाननी केली जाणार आहे. संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येण्याची शक्यता असून, त्यानंतर सुनावणी घेऊन आयुक्त अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेतील 16 नगरसेवकांचे पद धोक्यात, राजकीय समीकरणे बदलणार?

लक्ष्मण सोळुंके, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नव्याने निवडून आलेल्या 16 नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरसेवकांच्या अपात्रते  संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला असून, यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

MIM च्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक तक्रारी

महापालिका आयुक्तांकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सरकारी जागेवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, तिसरे किंवा चौथे अपत्य असल्याची माहिती, खोटे जात प्रमाणपत्र, तसेच नामांकन अर्जात चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या गंभीर स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त स्तरावर प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दाखल झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक 16 तक्रारी एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांविरोधात असल्याची माहिती समोर आली आहे. काही नगरसेवकांविरोधात एकापेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याने त्यांची अडचण वाढ झालीय. इतर पक्षांच्या काहीन गरसेवकांविरोधातही तक्रारी दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

(नक्की वाचा-  MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?)

नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देणार?

महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व तक्रारींची कायदेशीर व तथ्यात्मक छाननी केली जाणार आहे. संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येण्याची शक्यता असून, त्यानंतर सुनावणी घेऊन आयुक्त अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आयुक्त यांनी केलेल्या चौकशीत तक्रारी सिद्ध झाल्या, तर संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरवून त्यांचे पद रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, आयुक्तांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे.

राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने 33 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. तर भाजपने 57 जागा जिंकून महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र भाजपला स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ एका जागेने कमी पडत असल्याने, आगामी काळात सर्वच पक्षांकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत.

(नक्की वाचा- Pune News: अजितदादांच्या मृत्यूच्या दु:खादरम्यान पुणे मनपाचा अजब निर्णय; चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग )

या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी “वेळ येताच आम्ही आमचे पत्ते उघडू” असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र एमआयएमच्या 16  नगरसेवकांविरोधात अपात्रते संदर्भातील तक्रारी दाखल झाल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे. या तक्रारींच्या चौकशीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपकडून नैसर्गिक मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाणार का, की इतर पर्यायांचा विचार केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com