सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात वाढलेल्या ओझर्डे येथील अवघ्या 3 वर्षांच्या रायाजी सुधीर घारे याने वयाच्या मानाने अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली आहे. त्याने आतापर्यंत 50 गड-किल्ल्यांवर यशस्वी चढाई केली असून, त्याच्या या थक्क करणाऱ्या पराक्रमाची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने (India Book of Records) घेतली आहे.
40 दिवसांत तीन सर्वोच्च शिखरे सर
रायाजीने गेल्या 40 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधील तीन सर्वात कठीण आणि उंच शिखरे सर करून नवा इतिहास रचला आहे.
- कळसूबाई (महाराष्ट्र): 5400 फूट उंच असलेले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्याने अवघ्या 4 तास 20 मिनिटांत सर केले.
- साल्हेर किल्ला: 5157 फूट उंचीवर असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यावरही त्याने यशस्वी चढाई केली.
- गिरनार (गुजरात): 3666 फूट उंचीचा गिरनार पर्वत त्याने 5 तास 1 मिनिटांत पार केला.

(नक्की वाचा- Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)
कुटुंबीयांची भक्कम साथ
रायाजीला वयाच्या अवघ्या 1 वर्षे 8 महिन्यांपासून गड-किल्ल्यांची ओढ लागली. 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुर्गराज रायगडाच्या दर्शनाने त्याच्या या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. वडील सुधीर घारे, आई प्रिया आणि बहीण श्रीजा हे स्वतः उत्तम गिर्यारोहक असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रायाजी ही दुर्गभ्रमंती करत आहे.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)
वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने पाऊल
रायाजीच्या कळसूबाई आणि साल्हेर मोहिमेची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये अधिकृत नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या गिरनार मोहिमेची नोंद आता 'वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये (World Records) होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्याचे वडील सुधीर घारे यांनी दिली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 350 हून अधिक किल्ले रायाजीने पाहावेत आणि ती संस्कृती अनुभवावी," असे स्वप्न घारे कुटुंबियांनी उराशी बाळगले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग आहे. याच मातीतील एका चिमुकल्याने एवढ्या लहान वयात दाखवलेले शौर्य आणि शारीरिक क्षमता सध्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world