बदलापुरातील एमआयडीसीमध्ये (Badlapur MIDC Blast) झालेल्या स्फोटात एका जीवाचा हकनाक बळी गेला आहे. येथील एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये रिअॅक्टरचा 100 किलो वजनाचा एक तुकडा उडून जवळच्या चाळीतील एका घरावर जाऊन कोसळला होता. यावेळी गाढ झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या पायावर हा तुकडा कोसळला आणि त्याचे पाय शरीरापासून वेगळे झाले. पहाटे झोपेत असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काहीही चूक नसताना या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा जीव गेला.
बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या घनश्याम मेस्त्री यांचा मंगळवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. माणकिवली एमआयडीसीतील रेअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी होती, रिअॅक्टरचा 100 किलो वजनाचा एक तुकडा उडून तब्बल 400 मीटर अंतरावरील खरवई परिसरातल्या चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीत राहणाऱ्या मेस्त्री कुटुंबाच्या घराचा छताचा पत्रा फोडून गाढ झोपेत असलेल्या घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर हा 100 किलो रिअॅक्टरचा तुकडा कोसळला.
नक्की वाचा - क्षुल्लक कारणावरुन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; चीड आणणारा VIDEO समोर
यात त्यांचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले. तर त्यांची मुलगी आणि पत्नी यांनाही दुखापत झाली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत घनश्याम यांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या पायावर रात्री शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. मात्र यानंतर उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 35 वर्षांच्या घनश्याम मेस्त्री यांच्या मृत्यूमुळे मेस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world