Pune News: पहिलं टार्गेट फसल्याने आयुष कोमकरचा बळी; पोलिसांनी सांगितलं आरोपींचं A टू Z प्लानिंग

आयुष कोमकर हत्येआधी सोमनाथ गायकवाड याचं कुटुंब टार्गेटवर होतं. सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली असून, 5 आरोपी अजूनही फरार आहेत. अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील मुख्य आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी केवळ आरोपींवरच कारवाई केली नाही, तर या टोळीला सोशल मीडियावर फॉलो करून त्यांचे रिल्स किंवा फोटो अपलोड करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

पहिलं टार्गेट हुकलं

आयुष कोमकर हत्येआधी सोमनाथ गायकवाड याचं कुटुंब टार्गेटवर होतं. सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. काही महिन्यांपूर्वी दत्ता काळे या आरोपीला भारती पोलीस हद्दीतून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने पोलीस चौकशीत गायकवाड कुटुंब टार्गेटवर असल्याचं सांगितलं होतं. अशारीतीने या प्रकरणातील मूळ टार्गेट सोमनाथ गायकवाड याचे कुटुंब होते, मात्र यात नंतर आयुष कोमकरचा बळी गेला, असेही पोलिसांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री)

आठ आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये यश पाटील, अमन पठाण, अमित पाटोळे, सुजल मेरगुळ यांसोबतच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या भूमिकाही स्पष्ट केल्या आहेत. यश पाटील आणि अमन पठाण यांनी गोळीबार केला होता. तर, अमित पाटोळे आणि सुजल मेरगुळ यांनी शस्त्रे पुरवली होती आणि गुन्ह्यापूर्वी रेकी करण्याचे महत्त्वाचे काम केले होते. अजूनही 5 आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. फरार आरोपींमध्ये कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांचा समावेश आहे.

Advertisement

(नक्की वाचा- मामाची हत्या, भाच्याच्या खूनाने बदला! धडाधड 9 गोळ्या अन् घोषणा.. आयुष कोमकरला कसं संपवलं?)

फॉलोअर्सना पोलिसांचा गंभीर इशारा

या प्रकरणात, पोलिसांनी एक नवीन आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे. आयुष कोमकरच्या हत्येतील आरोपींच्या टोळीशी संबंधित सोशल मीडियावर रिल्स किंवा फोटो अपलोड करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. अनेक वेळा अशा गुन्हेगारी टोळ्यांचे फॉलोअर्स सोशल मीडियावर त्यांचे फोटो, रिल्स किंवा स्टेटस ठेवून त्यांचे उदात्तीकरण करतात. ज्यामुळे इतर तरुणांना चुकीचा संदेश मिळतो. पोलिसांचा हा इशारा अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा आहे.