जाहिरात

Ambarnath Constituency : ठाकरे गटाच्या उमेदवाराची अडचण वाढली, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप

राजेश वानखेडे यांनी 2014 साली सुद्धा अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आणि यंदाच्या निवडणुकीत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र यात तफावत आहे.

Ambarnath Constituency : ठाकरे गटाच्या उमेदवाराची अडचण वाढली, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्टॅम्प पेपरवर तक्रारही केली आहे.

राजेश वानखेडे यांनी 2014 साली सुद्धा अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आणि यंदाच्या निवडणुकीत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र यात तफावत असून एक व्यावसायिक गाळा, बँकेची खाती, सोनं, व्यावसायिक पॅन कार्ड अशी माहिती वानखेडे यांनी लपवल्याचा आरोप सुनील अहिरे यांनी केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Rajesh Wankhede

Rajesh Wankhede

तर याबाबत राजेश वानखेडे यांना विचारलं असता, मी कोणतीही माहिती लपवलेली नसल्याचं सांगत त्यांनी अहिरे यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. निव्वळ मीडियासमोर येण्यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचा टोलाही त्यांनी अहिरे यांना लगावला आहे.

( नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड )

अंबरनाथमध्ये 22 उमेदवार रिंगणात

अंबरनाथ विधानसभेत दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील दोन बंडखोरांचाही समावेश आहे. अंबरनाथ विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे डॉ. बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. 

(नक्की वाचा: "मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य", शरद पवारांनी उलगडून सांगितलं)

राजेश वानखेडे नावाच्याच आणखी एका उमेदवाराने नामसाधर्म्य साधत दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम असून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे बंडखोर डॉ. जानू मानकर आणि काँग्रेसचे बंडखोर सुमेध भवार यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे नामसाधर्म्य असलेला उमेदवार आणि दोन बंडखोर यांचा शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या थेट लढतीवर कितपत परिणाम होतो? हे आता पाहावं लागणार आहे. 

दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता अंबरनाथ मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे ते नामसाधर्म्य पाहून नव्हे, तर मशाल चिन्ह पाहूनच मतदान करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.