Political News : शिवेसना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना सध्या जोरात सुरु आहे. मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांना एकमेकांशी बोलावं, असं मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, शहरभर ‘खिळेमुक्त वृक्ष अभियान' राबवले जात आहे. याठिकाणी अमित ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित ठाकरे यांनी म्हटलं की, "आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल. पुढाकार कोणीही घ्यावा. मात्र मी घेऊ शकत नाही."
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा युतीबाबत सूचक विधान केले होते. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी भांडणे आणि वाद क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणे कठीण नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील युतीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका)
युती झाल्यास महापालिका निवडणुकीवर परिणाम
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मनसे ठाकरे गट एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची मराठी मतांची टक्केवारी निर्णायक ठरू शकते. शिवसेना मनसे युती झाल्यास महायुती आणि इतर पक्षांना आव्हान निर्माण होऊ शकते. याशिवाय मनसेृ-ठाकरे गट युतीमुळे महाविकास आघाडीला बळ मिळू शकते.