भुपेंद्र आंबवणे, भिवंडी
बदलापूर येथे चिमुरडीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच भिवंडीत खाजगी संस्थेच्या आश्रमातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चिमुरडीवर आश्रमात चटके देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अमीना बाग परिसरात राहणाऱ्या यास्मीन रफिक शेख यांनी आपल्या तीन वर्षांच्या नातीला धामणकर नाका परिसरातील महावीर कॉम्पलेक्स इमारतीमध्ये दत्ता गायसमुद्रे यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे सुरू असलेल्या शोभा आश्रमात ठेवले होते. या ठिकाणी 23 मे ते 15 जुलै 2024 दरम्यान त्यांच्या नातीच्या अंगावर फोड येऊन फुटल्याच्या जखमा झाल्याचे लक्षात आले. यानंतरक चिमुकलीला ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
(नक्की वाचा- डोंबिवली हादरलं, रस्त्यावर अल्पवयीन मुली दिसताच त्यानं केलं भयंकर कृत्य!)
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की, या जखमा भाजल्याने झाल्या आहेत. तसा अहवाल डॉक्टरांनी भोईवाडा पोलिसांना दिला. त्यानंतर आश्रम संचालकांनी तिच्या पोटावर, पाठीवर, डाव्या कानाच्या मागे व डाव्या डोळ्याच्या बाजूला चटके दिल्याची तक्रार आजीने दिली.
आजीच्या तक्रारीवरून आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे याला पोलिसांनी अटक केली आहे. गायसमुद्रे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) सह बालन्याय (मुलांची काळजी) हक्कांचे संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : बदलापूरची 'ती' शाळा अद्याप बंदच, विद्यार्थी - पालकांची सरकारकडे मोठी मागणी )
आरोपीला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरचे आश्रम अनधिकृत होते की अधिकृत यासह इतर चौकशी सुरु आहे, अशी माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world